पनवेल दि.२५: सिडकोने बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रो कारशेड येथे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत या मेट्रोची ट्रायल आम्ही होऊ देणार नसल्याचे सांगून पोलिसांनी यांना फुकट संरक्षण कशाला द्यायचे असे विचारून आम्ही रोज काम बंद करणार आहोत, पोलिसांना रोज यावे लागेल, असा इशाराही दिला.
या आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, विकास घरत, संतोष भोईर, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ब्रिजेश पटेल, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सचिव मन्सूर पटेल, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ओबीसी नेते एकनाथ देशेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, रमेश खडकर, शशिकांत शेळके, समीर कदम, जिल्हा परिषेदच्या माजी सभापती प्रिया मुकादम, आशा बोरसे, दिनेश खानावकर, निर्दोष केणी, अमीर कदम, नंदकुमार म्हात्रे, सय्यद अकबर, प्रभाकर जोशी, शफी पटेल, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्थानिक प्रकल्पग्रस्त महिला, पुरुष सहभागी झाले होते.
आमदार प्रशांत ठाकूर हे 2015 पासून याकरिता पाठपुरावा करत आहेत. जेव्हा हा प्रकल्प कार्यान्वित होईल त्यावेळी नक्कीच विचार केला जाईल अशा प्रकारचे ग्वाही सिडकोकडून देण्यात आली होती. आता बहुतांशी कामे पूर्ण झाली असून ऑपरेशन च्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये कार्यालयीन कामकाजासाठी नागपूर मधून भरती करण्यात आली आहे. याबाबत स्थानिकांना डावलले गेले असल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवक हरेश केणी, भाजपचे स्थानिक नेते प्रल्हाद केणी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
परंतु सिडकोकडून वेळकाढू धोरण अवलंबण्यात आले. या सर्व गोष्टींचा विचार करुन आज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तळोजा येथील मेट्रो कार शेड समोर आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत सिडको आम्हाला लेखी आश्वासन देत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवू अशा प्रकारचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान आंदोलकांनी कारशेड समोर ठिय्या मांडला. पोलिसांनी मध्यस्थी करुन आंदोलकांना चर्चेस निमंत्रण दिले. मात्र लेखी आश्वासने देण्यात येत असेल तरच चर्चा केली जाईल. अन्यथा कार शेड मध्ये घुसून त्यांचे काम बंद करु अशा प्रकारचा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह इतर नेत्यांनी दिला. परंतु येथे सक्षम अधिकारी नाही. तसेच अशा प्रकारचे लेखी देता येत नाही असे संबंधित कार्यालयाकडून सांगण्यात आल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांचा विरोध डावलून मेट्रो कार शेड मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तुमचे गेट बंद असले तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना इतर मार्गही माहीत असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला. आमच्या महिला- भगिनी घरात करमणूक नाही म्हणून येथे उन्हातान्हात बसलेल्या नाहीत. आमच्या नगरसेवकांना दुसरे काम नसल्याने येथे आलेले नाहीत. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सिडको गांभीर्याने घेत नसल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे. तहान लागल्यावर विहीर खोदणारे सिडको व मेट्रोचे अधिकारी आहेत. त्यांना 15 दिवस आधी नोटीस दिल्यावर आता चर्चेला बोलवत आहेत. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही. पोलिसांच्या बंदोबस्ताच्या आड लपणार्या अधिकार्यांमुळे आम्हाला आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या दरम्यान तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चव्हाण अनेक वेळा आंदोलक आणि मेट्रोच्या अधिकार्यांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते, पण मेट्रोच्या अधिकार्यांनी लेखी आश्वासन देण्यास नकार दिला. जोपर्यंत आम्हाला प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही गेटवरून हलणार नाही, अशी भूमिका घेऊन तीन तास उन्हात बसलेल्या आंदोलकांना मेट्रो अधिकार्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आंदोलकांनी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केल्यावर आमदार प्रशांत ठाकूर व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर सर्वांना सोडून देण्यात आले. आमच्यावर गुन्हे दाखल करताना पोलीस कोविड प्रोटोकॉल मोडल्याचाही गुन्हा दाखल करतील. मग ज्या सिडको आणि मेट्रो अधिकार्यांमुळे आम्हाला आंदोलन करावे लागले त्यांच्यावरही पोलीस कोविड प्रोटोकॉल मोडल्याचे गुन्हे दाखल करणार काय, असा सवाल यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.