पाली दि.२३: येत्या काळात कोकणातील पालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार सर्वत्र भाजपचे साम्राज्य दिसेल. इतर कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान नसेल, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज पाली येथे व्यक्त केला. मंदिरे बंद असो अथवा सुरू गणपती आम्हाला पावतो, असेही ते बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यावर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या वतीने नव्याने सहभागी झालेले मंत्री जनतेत जाऊन आशीर्वाद घेत आहेत. या अंतर्गत ना. नारायण राणे यांचीही जनआशीर्वाद यात्रा सुरू असून या यात्रेचा रायगड जिल्ह्यातील प्रारंभ आज पाली येथून झाला. त्या वेळी ना. राणे बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबविलेल्या योजना व उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावेत यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली असून सर्वत्र जनतेचे भरभरून प्रेम, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारला मंदिरे सुरू करायला भीती वाटते. मंदिरे सुरू केली आणि यांचे सरकार पडायचे, आम्हाला मंदिरे सुरू असो वा बंद गणपती पावतो, असे सांगून राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभारावर सतत बोलणार, असे ना. नारायण राणे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचे नाव कार्यकर्तृत्वाने जगाच्या कानाकोपर्यात पोहचवले. गोरगरीब, सामान्यातील सामान्य घटकाला विविध योजनांच्या माध्यमातून सुखसुविधा देण्याचे काम मोदी सरकारने केलेय, असेही ना. राणे यांनी नमूद केले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या जनमानसाला व तळागाळातील घटकाला स्पर्श करणार्या योजनांची माहिती देण्याची भूमिका घेऊन केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेत जात आहेत आणि याला उदंड प्रतिसाद मिळतोय.
ना. नारायण राणेंच्या रायगडातील जनआशीर्वाद यात्रेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय चिटणीस सुनील देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा कंदिल दाखविला, तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्यासह बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप व विश्वस्त मंडळाने ना. राणे यांचा सत्कार केला. या वेळी बल्लाळेश्वर मंदिर ते पालीतील शिवस्मारक अशी भव्य रॅली काढण्यात आली. ना. राणे यांनी स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, सागर मोरे, युवक अध्यक्ष रोहन दगडे, चंद्रकांत गोफण, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, रिपाइंचे सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, भगवान शिंदे, सरपंच शरद चोरघे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.