माणगाव दि.३: रायगड प्रेस क्लबशी संलग्न असणार्या गोरेगांव-लोणेरे प्रेस असोसिएशनच्या वतीने गोरेगांव येथील मुमताज गार्डन या भव्य मैदानावर आयेाजित पत्रकार चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद रोहा प्रेस क्लबने पटकावले असून, गोरेगांव प्रेस असोसिएशन संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गोरेगांव येथील मुमताज गार्डन मैदानावर रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत बारा संघ सहभागी झाले होते. त्याशिवाय माणगांव पोलीस, गोरेगांव पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बार असोसिएशन या चार संघातही सन्मानित सामने खेळविले गेले.
बाद पद्धतीने खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रोहा प्रेस क्लब आणि गतवर्षीचे विजेते गोरेगांव प्रेस असोसिएशन या दोन संघादरम्यान खेळली गेली. प्रथम फलंदाजी करित, गोरेगांव संघाने तीन षटकात ३१ धावा फटकावल्या. रोहा प्रेस क्लबच्या शंतनू अष्टीवकर याच्या फटकेबाजीने रोहा संघाने हे आव्हान यशस्वी परतवून लावित, पत्रकार चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील तृतीय क्रमांक पेण प्रेस, तर चतुर्थ क्रमांक अलिबाग प्रेसने पटकावला.
चारही विजेत्या संघांना रोख पारितोषिके, चषक
चारही विजेत्या संघांना रोख पारितोषिक आणि चषक देऊन, मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान स्पर्धेचे उद्घाटनाचा पहिला सामना बार असोशिएशन आणि माणगांव पोलीस यांच्यामध्ये झाला. दुसरा सामना गोरेगांव पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव या दोन संघात झाला. या सन्मानार्थ आयोजित सामन्यात माणगांव पेालीस विजेते, तर गोरेगांव पेालीस उपविजेते ठरले. त्याना आकर्षक ट्रॉफी देऊन, गौरविण्यात आले.
प्रत्येक सामन्यातील खेळाडुला सामनावीर म्हणून ट्रॉफी
प्रत्येक सामन्यातील खेळाडूला सामनावीर म्हणून आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविले. मालिकावीर म्हणून अलिबागचा भूषण पाटील, उत्कृष्ट फलंदाज रोह्याचा शंतनू अष्टीवकर, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गोरेगांव संघाचा वैभव टेंबे यांनाही ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचा शुभारंभ माणगावं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोराडे यांच्या हस्ते झाला. पारितोषिक वितरण कार्यक्रमास आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे युवा नेते उद्योजक नरेश अहिरे, जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, सरपंच जुबेर अब्बासी, शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत यादव, मधुकर नाडकर, उद्योजक सागर भोसले, चिंचवलीचे माजी सरपंच कृष्णा तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिन मनोज खांबे, रायगड प्रेसचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव, श्रीमती दळवी, संदीप साळवी आदि मान्यवर उपस्थित होते.