पनवेल मिडिया प्रेस क्लबकडून पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन
पनवेल दि.४: महाराष्ट्राला पत्रकारांचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. आणिबाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या भूमिका महत्वपुर्ण होत्या, या पत्रकारांचा वारसा वेगवेगळ्या माध्यमातून आजही जिवंत आहे. पनवेल मिडिया प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकारदिनानिमित्त करोनाच्या संकटात समाजाला साथ देणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार केला, कर्तृत्वानांचा सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचा काम पनवेल मिडिया प्रेस क्लबने केले आहे, असे उदगार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
पनवेलमधील सुरूची हॉटेलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या संकटकाळात समाजातील गरजूंना मदत केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कॉग्रेस नेते महेंद्र घरत, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल मिडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश कोळी आदी उपस्थित होते.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दरेकर यांनी सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करताना सध्या पत्रकारांची मुस्कटदाबी होत असल्याचे मत व्यक्त केले. आणिबाणीच्या काळात ज्याप्रमाणे पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यात आली, त्याप्रमाणे सध्या काही प्रमाणात परिस्थिती असल्याचे भाष्य़ केले. पत्रकार सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतात, त्यामुळे पत्रकारांना ताकद देवून पत्रकारांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले की मी रायगडच्या मातीतला माणूस म्हणून या कार्यक्रमाचे मला विशेष कौतुक आहे. पत्रकारांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजाला दिशा देणारा आहे, नव्या पिढीला प्रोत्साहन देणारा, प्रेरणा देणारा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते, मात्र केवळ आरसा न राहता समाजाला दिशा देण्याचा कार्यक्रम पत्रकार करीत आहेत. पत्रकारांना टाकलेल्या चांगल्या पाऊलावर पाऊल टाकत समाजाने कर्तृत्वाला सलाम या कार्यक्रमाचे अनुकरण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. रामशेठ ठाकूर यांनी कर्तृत्वानांचा सत्कार करीत असताना तुम्ही समाजात केलेल्या कामामुळे आपण सगळे मिळून करोनावर मात करू शकलो, नागरिकांनी प्रत्येकाची जबाबदारी ओळखून प्रत्येकाने काम केले, प्रत्येकाने सुरक्षितता बाळगल्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात करोनावर मात करू शकलो. महानगरप्रमुख रामदास शेवाळे आणि डॉ. गिरीश गुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पनवेल महापालिकेच्या स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सामाजिक संस्था, डॉ. गिरीश गुणे, डॉ. नागनाथ यमप्पल्ले, डॉ. साजिद खान, डॉ. आरिफ दाखवे, डॉ. अरूणा पोहरे, दिपक सिंग, श्री. भगवती साई संस्थान, सचिन दुंदरेकर, शिवसहाय्य संस्था पनवेल, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, एकता सामाजिक संस्था आदींचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!