नवी मुंबई दि. 5: शासकीय कामकाजात दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी सर्व घटकांसोबतच वाहनचालकाची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असते. गुणवंत पाल्यांनी भविष्यात कितीही मोठे व्हावे. कोणत्याही पदावर जावे परंतु प्रथम एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी केले.
कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या वाहनचालक, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच शालेय परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या वाहनचालकांच्या पाल्यांचा सत्कार शासकीय वाहन चालक संघटना मंत्रालय, मुंबई शाखा ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज कोकण भवन बैठक कक्ष पहिला मजला येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते..
यावेळी व्यासपीठावर मनोज रानडे, उप आयुक्त सामान्य प्रशासन, विकास रामगुडे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, बांद्रा, मुंबई, आर. एम. गोसावी, अधिक्षक अभियंता, रायगड सा.बा. मंडळ, कोकण विभाग, डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (माहिती) कोकण विभाग, रामदास आरेकर, वरिष्ठ खोदण अभियंता, भूजल सर्वेक्षण विभाग, डॉ.गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी, कोकण भवन, माधुरी डोंगरे, नायब तहसिलदार, कोकण विभाग आदि मान्यवर उपस्थित होते. दिप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कोरोना महामारीच्या कठीण काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहनचालक, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पूष्पगूच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्य अभियंता विकास रामगुडे यांनी भगवान गौतम बुध्दांनी सांगितलेल्या प्रज्ञा, शील, करुणा या तीन गुणांचा विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात कसा समावेश करावा हे समजवून सांगितले.
खोदण अभियंता रामदास आरेकर यांनी वाहन चालकांव्दारे आयोजीत करण्यात आलेला असा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगून वाहन चालक संघटनेचे अभिनंदन केले.
अधिक्षक अभियंता आर.एम.गोसावी यांनी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन म्हात्रे हे त्यांच्या गाडीवर वाहनचालक असून ते कशा प्रकारे आदर्श वाहन चालक आहेत. वाहन चालकाने आपल्या गाडीची व साहेबाची कशी काळजी घेतली पाहिजे हे म्हात्रेंकडून शिकावे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित डॉ.गणेश मुळे यांनी देखील आपले कोरोना महामारीत लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाचे अनुभवन सांगितले या काळात आपल्या वाहनचालकाची शासकीय कामात कशी मदत झाली हे सर्वांसामोर मांडले व आपल्या वाहनचालकांचे अभिनंदन केले.
आरोग्य अधिकारी डॉ.गणेश धुमाळ म्हणाले की, कोरोनाची भीती असताना देखील वाहनचालक, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. असा कार्यक्रम सर्वत्र असण्याची आवश्यकता आहे.
या केलेल्या कामाबद्दल आपल्याच वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शासकीय वाहन चालक संघटना मंत्रालय, मुंबई शाखा ठाणे जिल्हयाचे अध्यक्ष जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा पाटणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शशिकांत भोसले, चंद्रकांत चंद्रराव, दिपक पवार, जितेंद्र यादव यांनी परिश्रम घेतले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!