रत्नागिरी दि.४ (सुनील नलावडे) सोमवार रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात खेड तालुक्यात ९८.६० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. धुवाँधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वहात आहेत. ग्रामीण भागातील नद्या-नालेही दुथडीभरून वाहू लागले असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवार रात्रीपासूनच धुवाँधार बरसायला सुरवात केली आहे. पावसाची रिपरिप रात्रभर सुरुच राहिली असल्याने नारिंगी आणि जगबुडी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. जगबुडीचे पाणी मच्छिमार्केट येथून शहराकडे उसळी मारू लागले आहे. तर नारिंगी नदीचे पाणी आजुबाजुच्या शेतांमध्ये घुसल्याने हा संपुर्ण परिसर जलमय झाला आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने जगबुडी नदीने मध्यरात्रीपासूनच रौद्ररुप धारण केले आहे. पाटबंधारे विभागाचे अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजता जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ७.५ मीटर इतकी होती. जगबुडी नदीची पातळी ७.५ मिटरपर्यंत वाढणे म्हणजे शहरासाठी पुराच्या धोक्याची घंटा असल्याने व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरवात केली आहें.
खेड दापोली मर्गावरील नारंगी नदीचे पाणी नदीकाठच्या भातशेतीला कवेत घेऊन पहाटेच्या वेळेत सुर्वे इंजिनिअरिंग जवळ आल्याने खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक क्षेत्रपाल नगरमार्गे वळविण्यात आली आहे. खेड-बहिवरली मार्गावरील सुसेरी पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतुकही रोखण्यात आली. त्यामुळे खाडीपट्टा परिसराचा शहराशी असलेल्या सपंर्क तुटला. नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे खेड- सुसेरीला जोडणारा पुलही पाण्याखाली गेल्याने खेड-सुसेरीचा संपर्क तुटला आहे.
धुवाँधार पावसामुळे तालुक्यातील नातुवाडी, शिरवली, पिंपळवाडी, शेलारवाडी आणि तळवट ही पाचही धरणे ओव्हरफ्लो होवून वाहू लागली आहेत. धरणातून वाहणारे पाणी जगबुडी नदीला येऊन मिळत असल्याने जगबुडी नदीची पातळी क्षणाक्षणाला वाढत आहे. त्यामुळे खेडच्या बाजारपेठेला कधीही पुराचा विळखा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.