ठाणे दि.5: (संजय नाईक – प्रकाशचित्रकार, ठाणे.)
काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्ता आणि आमचा मित्र मंदार जोशी याने बाबरी वरील दिनदर्शिका व त्यावरील वाक्याचा उल्लेख त्याच्या फेसबुक वरील एका लेखात केलेला वाचनात आला आणि अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या याच दिनदर्शिकेच्या जन्माच्या स्मृती चाळवल्या गेल्या. 
                  ४ / ५ डिसेंबर १९९२ ला साधारण दीड – दोन लाख हिंदू करसेवक अयोध्येत जमा झाले होते. राम जन्मभूमी चा विषय जोरावर होता ,आणि त्याचे आपण प्रकाशचित्रण करायला हवे हा निश्चय करून ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रकाशचित्रकार व माझे मित्र – गुरु प्रवीण देशपांडे आयोध्येकडे रवाना झाले. खरंतर लालकृष्ण अडवाणीजींच्या २ ऑक्टोबर १९९० साली निघालेल्या सोमनाथ ते अयोध्या या ऐतिहासिक रथयात्रेचे आरंभापासून ते अडवाणीजींना समस्तीपूर ला अटक होईपर्यंतचे प्रकाशचित्रण करणे हा दांडगा अनुभव प्रवीण च्या गाठीशी होताच (आत्माराम कुलकर्णी यांच्या The Advent of Advani  – An Authentic Critical Biography या अडवाणीजींच्या आत्मचरित्रात प्रवीणचा उल्लेखही आहे.) 

                  प्रवीण व मी त्याकाळात वृत्तपत्रांकरिता प्रकाशचित्रणाचे काम करत असू व ‘प्रतिबिंब’ या नावाने एक डार्करूमही चालवत असू. ठाण्यात घडणाऱ्या बहुतांश राजकीय व सामाजिक घडामोडी प्रकाशचित्रित करून वृत्तपत्रांना पुरवीत असू. त्या काळात वर्त्तपत्रांचे ठाण्याकरिता खास असे प्रकाशचित्रकार नसत. 

                  प्रवीण अयोध्येला गेला व दूरध्वनी वरून तेथील काही तपशील कळवत होता. आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी च्या विवादास्पद ढांचावर चाल करून करसेवकांनी संपूर्ण वास्तू जमीनदोस्त केली. त्या उडालेल्या गदारोळात प्रवीणला मारहाणही झाली व कॅमेराचीही हानी झाली. परंतु चित्रित केलेले फिल्म रोल आपल्या पायमोजात लपवून प्रवीण या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार बनून मागे फिरला. कालांतराने प्रवीणच्या कॅमेरा तुटल्याची घटना प्रमोद जी महाजनांना समजली व त्यांनी काही आर्थिक साहाय्य केल्याचेही मला स्मरते … 

                    ठाण्यात पोहोचल्यावर सर्व रोमहर्षक वृत्तांत प्रवीणने आम्हाला कथन केला. रोल धुतल्यानंतर (प्रोसेस केल्यावर) प्रकाशचित्रे पाहून घटनेचे वास्तव स्वरूप आमच्या डोळ्यासमोर उभे राहिले. असो, त्या काळातील एक धडाडीचे आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणजे स्वर्गीय आनंद जी दिघे. त्यांच्याही अनेक कार्यक्रमांचे प्रकाशचित्रण आम्ही करत असू. प्रवीण आयोध्येहून परतल्याने समजताच त्यांनी सर्वाना भेटीसाठी बोलाविले, बराचवेळ चर्चा झाली. दुसऱ्याच दिवशी आम्हाला घेऊन त्यांनी ‘मातोश्री’ गाठली व बाळासाहेबांची भेट घडवून आणली ,शिवाय बाळासाहेबांना आग्रहाने त्यांच्या कपाळावर ‘ जय श्री राम ‘ असा उल्लेख असलेली भगवी पट्टी बांधून आम्हाला प्रकाशचित्रे टिपण्याची संधी उपलब्ध करून दिली . 

                    ठाण्यात परतल्यावर प्रवीणच्या बाबरी च्या प्रकाशचित्रांवर आधारित एक दिनदर्शिका करावी ज्यावर बाळासाहेबांचे ते जय श्री राम ची पट्टी असलेले चित्र असावे असे ठरले . या प्रक्रियेत कला दिग्दर्शक विनोद ढगे , यांनी त्याची योग्य मांडणी केली . (त्याकाळात संगणक नसल्याने सर्व काम हातानेच केले जात असे.) त्यावर बाळासाहेबांचे ” हे ज्यांनी केले त्यांचा मला अभिमान वाटतो !”  हे वाक्य आणि बाळ ठाकरे अशी त्यांची स्वाक्षरी लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली … कालांतराने त्या दिनदर्शिकेने काय गदारोळ उडाला हे त्याकाळच्या सर्वांनाच ज्ञात आहे किंवा असेलच … मी जास्त खोलात जात नाही . 

                   टेंभी नाक्यावरील केशकर्तनालयाचे मालक व आमचे मित्र बाबू यांनी या दिनदर्शिकेची प्रत नुकतीच माझ्या आग्रहाखातर उपलब्ध करून दिली त्यांचे मनःपूर्वक आभार … आज आनंद जी दिघे आपल्यात नाहीत ,परंतु या विषयात सहभागी असणारे सुप्रसिद्ध प्रकाशचित्रकार प्रवीण देशपांडे , शिरीष साने, पत्रकार नंदकुमार वाघ ,विनोद ढगे आणि या दिनदर्शिकेवरील वाक्य व बाळासाहेबांची हुबेहूब स्वाक्षरी करणारा मी आजही जेंव्हा एकत्र येतो तेंव्हा या आठवणींना नेहमीच उजाळा मिळतो ….

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!