आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यास सांगितले आहे. प्रदोषकाल म्हणजे रात्रीमानाचे पाच भाग करायचे त्यातील सूर्य मावळल्यापासूनचा पहिला भागाला ‘प्रदोषकाल‘ म्हणतात.आज सायंकाळी. ६ वाजून ४ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत या काळात प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेर पूजन करावयाचे आहे. या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून ईश्वरपूजा करावयाची आहे. तसेच प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेरपूजन व अलक्ष्मी निस्सारण करावयाचे आहे. याच दिवशी महावीर निर्वाण दिन आहे.
आश्विन अमावास्येच्या दिवशी प्रदोषकाली भगवान विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले . म्हणून आपण या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन करीत असतो. लक्ष्मी- कुबेर पूजन कसे करायचे ते आपण प्रथम पाहुया.
एका चौरंगावर स्वस्तिक काढावे. त्यावर कलश ठेवावा. कलशावर ताम्हन ठेवून त्यात. लक्ष्मीची व कुबेराची प्रतिमा ठेवावी. तसेच नवीन वर्षाच्या हिशेब लिहीण्याच्या वह्या आणि लेखन साहित्य ठेवावे.. जवळच दिवा लावून ठेवावा. स्नान करून पूजेचा संकल्प करावा. नंतर श्रीसूक्त म्हणत ल्क्ष्मी-कुबेर, हिशेबाच्या वह्या यांची षोडशोपचारे पूजा करावी. धने, गूळ, साळीच्या लाह्या , बत्तासे व चवळीच्या शेंगा लक्ष्मीला वाहाव्या. गाईच्या दुधात वेलची, लवंग व साखर घालून त्याचा आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा. नंतर पुष्पांजली अर्पण करून लक्ष्मीची प्रार्थना म्हणावी.—
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरे: प्रिया ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ॥
“( हे लक्ष्मी,) तू सर्व देवांना वर देणारी आणि श्रीविष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणार्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.“
त्यानंतर कुबेराची प्रार्थना म्हणावी. —
धनदाय नमस्तुंभ्यं निधिपद्माधिपाय च ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पद: ॥
“निधी आणि पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला नमस्कार असो. तुझ्या कृपेने ( मला ) धनधान्यादी संपत्ती प्राप्त होवो.“
श्रीलक्ष्मी
पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधू लागते. जिथे स्वच्छता, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असेल तेथे ती आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान , कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ , संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
केवळ पैसा किंवा संपत्ती म्हणजे लक्ष्मी नव्हे ! चांगल्या मार्गाने मिळविलेल्या आणि चांगल्या मार्गाने खर्च होण्यार्या पैशाला ‘ लक्ष्मी ‘ म्हणतात. भ्रष्टाचाराने, अनीतीने व लबाडीने मिळविलेल्या पैशाला ‘लक्ष्मी ‘ म्हणत नाहीत.
लक्ष्मी ही विष्णुपत्नी , देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले त्यालेळी लक्ष्मी सागरातून बाहेर आली. लक्ष्मी हा शब्द ‘ चिन्ह ‘ यावरून बनलेला आहे. ‘ श्री ‘ म्हणजे लक्ष्मी ! श्री हे अक्षर स्वस्तिकापासून बनले आहे. लक्ष्मीचे लक्ष्म म्हणजे चिन्ह हे ‘स्वस्तिक‘ आहे.
लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी ठरल्यामुळे तिची (१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी आणि (८) राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे कल्पिलेली आहेत. लक्ष्मीचे ‘बल‘ आणि ‘उन्माद‘ असे दोन पुत्र असल्याचे सांगितलेले आहेत. मात्र हे भावात्मक पुत्र असावेत. कारण ज्याच्याकडे लक्ष्मी येते तो बलवान असतो, कधी कधी त्याला उन्मादही असू शकतो. श्रीसूक्तात मात्र लक्ष्मीच्या चार पुत्रांची आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लित अशी नावे सांगितलेली आहेत.
कुबेर
लक्ष्मीबरोबर कुबेराचीही पूजा केली जाते. कारण कुबेर हा संपत्तीचा रक्षक मानला जातो. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य, त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असल्याचे रामायणात सांगण्यात आले आहे. म्हणुनच कुबेराला ‘ वैश्रवण ‘ हे नाव प्राप्त झाले. कुबेराच्या आईचे नाव ‘इडविडा‘ तपश्चर्या करून कुबेराने ब्रह्मदेवाला संतुष्ट केले. त्याच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वसंरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. नंतर त्याने विश्वकर्म्याने बांधलेल्या सुवर्णमंडित अशा लंकेवर अधिकार मिळविला. कुबेर लंकेवर राज्य करू लागला.
महाभारतात कुबेराचा उल्लेख पुलस्त्याचा पुत्र असा केलेला असून जन्मत:च ब्रह्मदेवांने त्याला संपत्तीचा व लंकेचा स्वामी नेमले असे म्हटले आहे. रावणाने कुबेराची सारी संपत्ती व पुष्पक विमान पळवून नेल्यावर कुबेर गंधमादन पर्वतावर राहू लागला. हिमालयातील अलका ही कुबेराची नगरी होती. भागवत पुराणात त्या उपवनाचे, राजवाड्याचे वर्णन केलेले आहे. कुबेराचा हा राजवाडा विश्वकर्मा याने बांधला असा उल्लेख सापडतो. कौवेरी ही कुबेराची पत्नी होती. मणिग्रीव, नलकूवर हे त्याचे पुत्र व मीनाक्षी ही त्याची कन्या असल्याचे सांगण्यात आले आहे. कुबेराच्या वाहनांबद्दल मात्र वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळी मते मांडण्यात आली आहेत. कुबेर हा संपत्तीचा स्वामी होता, रक्षक होता आणि म्हणूनच लक्ष्मीबरोबर त्याचीही पूजा केली जाते.
कथा अलक्ष्मीची
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही लोक अलक्ष्मीचीही पूजा करून तिचे गावाबाहेर विसर्जन करतात. अलक्ष्मी ही दुर्भाग्याची, दारिद्द्र्याची देवता मानतात. हिच्य जन्माविषयीही एक कथा सांगितली जाते.देव आणि असुरांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी बाहेर आली. म्हणून अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठी बहीण मानतात. अलक्ष्मी बाहेर आली. तिचे तोंड काळे, डोळे लाल व तिच्या शरीरावर जन्मत: म्हातारपणाच्या खुणा होत्या. समुद्रमंथनातून बाहेर आल्यावर तिने देवांना विचारले की “मी कुठे राहू ? मी काय करू ?” देवांनी तिला सांगितले की “तू कोळसे, केस, कोंडा, अस्थी, अस्वच्छता असेल तेथे तू रहा. ज्या घरात कलह असेल, ज्या घरात असत्य व कठोर भाषणे असतील तेथे तू रहा. जेथे संध्याकाळच्यावेळी अभक्ष भक्षण होते, जेथे देव व गुरू यांचा अनादर होतो, जेथे परद्रव्य, अपहरण, परदारागमन, सज्जननिंदा इत्यादी गोष्टी चालतात तेथे तू रहा.“
सागरमंथनातून अलक्ष्मीनंतर लक्ष्मी बाहेर आली तिचा विवाह विष्णूबरोबर झाला. विष्णूनी अलक्ष्मीचा विवाह उद्दालक नावाच्या ऋषीबरोबर लावून दिला. परंतु अलक्ष्मीचे आणि उद्दालक ऋषींचे एकमेकांशी काही पटले नाही. अखेर उद्दालक ऋषीनी अलक्ष्मीला पिंपळाच्या झाडाखाली बसण्यास सांगितले. उद्दालक तिला सोडून निघाले ते पुन्हा तेथे आलेच नाहीत. अलक्ष्मीने उद्दालक ऋषींची खूप वाट पाहिली आणि ती रडू लागली. तो आक्रोश ऐकून विष्णू लक्ष्मीसह तेथे आले. त्यांनी तिचे सांत्वन केले व म्हणाले “तू पिंपळाच्या झाडाखालीच रहा. लक्ष्मी तुला भेटायला येईल. आश्विन अमावास्येला लक्ष्मीबरोबर तुझीही पूजा केली जाईल.
आश्विन अमावास्येच्या दिवशी अलक्ष्मीची शेणाची मूर्ती केली जाते.पूजा करून गावाबाहेर तिचे विसर्जन केले जाते. अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू असतो. काही लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करतात. अलक्ष्मी आपल्या घरात नको येऊ दे अशी प्रार्थना करतात.
एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी एका ऋषींकडे गेल्या. “आमच्यापैकी कोण संदर दिसते ?“ असे विचारू लागल्या. ऋषीनी त्यांना आश्रमाबाहेर असलेल्या झाडाला हात लावू येण्यास सांगितले. दोघीही चालत जाऊन झाडाला हात लावून आल्या. ऋषी कोणाला सुंदर म्हणणार याचा विचार करू लागल्या. ऋषी म्हणाले “अलक्ष्मी, तू जेव्हा आश्रमातून बाहेर जात होतीस तेव्हा सुंदर दिसत होतीस. लक्ष्मी, तू जेव्हा आश्रमात येत होतीस तेव्हा सुंदर दिसत होतीस “ त्या दोघीही खूश झाल्या. दारिद्र्य घरातून जाते आणि समृद्धी घरात येते त्या दोन्हीवेळी घर सुखी होत असते.
रांगोळीचा इतिहास
भारतात सण- उत्सवाच्या दिवशी देवापाशी आणि दरवाजा समोर रांगोळी काढण्याची पद्धत फार प्राचीन कालापासून चालत आलेली आहे. दिवाळी आणि रांगोळी यांचे अतूट नाते आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने आपण या रांगोळी कलेचा इतिहास जाणून घेऊया.
रांगोळी रांगवळी , रंगमाळी, रंगमाळा, रंगावली, रंगोली इत्यादी अनेक नावानी ओळखली जाते. विष्णुपुराणात लक्ष्मी-विष्णूच्या विवाहप्रसंगी शुभचिन्हानी, तसेच फुलांच्या रांगोळ्या काढल्याचा उल्लेख आहे. तुलसीरामायणातील बालकांडात “रंगवल्ली बहुविध काढल्या कुंजरमणिमय सहज शोधल्या“ असे राम-सीता विवाहप्रसंगीच्या वर्णनात सांगितलेलं आहे. मार्कंडेय पुराणात सडा संमार्जनानंतर रांगोळीने स्वस्तिकाकृती काढण्याचे महत्त्व वर्णन केलेले आहे. सातव्या शतकातील वरांगचरितमध्येही पंचरंगी चूर्णे ,धान्ये आणि फुले यांनी रांगोळी काढण्याचे तंत्र सांगितलेले आहे. शिशुपाल वधाच्या वर्णनात रांगोळीला ‘रांगवळी‘ असे म्हटले आहे. वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांमध्ये रांगोळी काढण्याच्या कलेचा उल्लेख आढळतो. पूर्वी कामदेव, सरस्वती मंदिरात रांगोळी काढली जात असल्याचा उल्लेख सापडतो.
रांगोळी ही भारतात सर्वत्र शुभप्रद आणि अशुभनिवारक मानली जाते. जिथे रांगोळी आहे तिथे देवदेवतांचा निवास असतो अशी लोकांची श्रद्धा आहे. पांढऱ्या दगडांपासून बनविलेले रवाळ चूर्ण रांगोळी म्हणून वापरली जाते. कोकणात भाताची फोलपाटे (करलं) जाळून त्याची पांढरी राख रांगोळी म्हणून वापरली जाते. कर्नाटकात रांगोळीला ‘रंगोली‘ म्हणून संबोधतात. आंध्रप्रदेशात ‘मुग्गुलू ‘ किंवा ‘मुग्गु‘ या नावाने ओळखतात.तांदुळाच्या पिठीचीही जमिनीवर किंवा भिंतीवर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. तेथे सात वारांच्या सात रांगोळ्या काढल्या जातात. तामिळनाडूमध्ये रांगोळीला ‘कोलम‘ या नावाने ओळखतात. तेथेही तांदुळाच्या पिठाचा वापर करतात. केरळमध्ये रांगोळीला ‘पुविडल‘ म्हणून ओळखतात. तेथे विविध रंगांची पाने-फुले वापरूनही रांगोळी काढली जाते. गुजरातमध्ये रांगोळीला ‘साथिमा‘ म्हणून ओळखतात. सौराष्ट्रात रांगोळीला ‘सथ्या‘ म्हणतात. राजस्थानमध्ये रांगोळीला ‘मांडणा‘ म्हणतात. बंगालमध्ये रांगोळी ‘अल्पना‘ या नावाने ओळखली जाते. बिहारमध्ये ‘अलिपना‘ , उत्तर प्रदेशात ‘सोनराखना आणि ओरिसामध्ये रांगोळीला ‘झुंटी – ओसा‘ या नावाने ओळखतात.
संपूर्ण भारतात रांगोळी ही पवित्र मानली गेली आहे. रांगोळीत विविध रंग भरून ती सजविली जाते. रांगोळीमध्ये बिंदू, सरळ रेषा, अर्धवर्तुळ, वर्तुळ, गोपद्म, सर्परेषा, कोयरी, स्वस्तिक, ॐ, केंद्रवर्धिनी तुरा, श्री, सरस्वती , कलश, शंख, चक्र, गदा, कमळ, ध्वज, धनुष्य, बाण, त्रिशूळ, त्रिदल, अष्टदल, शृंखला, श्रीफळ, विष्णुपाद, लक्ष्मीची पावले, दीप इत्यादी चिन्हे काढून रांगोळी अधिक सुंदर व वैभवसंपन्न केली जाते.
— दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक