आज शनिवार २ नोव्हेंबर २०२४ , कार्तिक शुक्ल प्रतिपदा , बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा ,अभ्यंगस्नान, विक्रम संवत् २०८१ अनलनाम संवत्सर, महावीर जैन संवत् २५५१, गोवर्धन पूजा, अन्नकूट,वहीपूजन आहे. आज व्यापारी लोक काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजलेल्या वह्यांवर लेखनास प्रारंभ करतात. आज पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला मौल्यवान वस्तूची भेट देतो. आजचा बलिप्रतिपदेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. आज मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच आज बलिप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर शुभ कार्याचा प्रारंभ करतात.
व्यापारीवर्गासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी वहीपूजन व वहीलेखनासाठी मुहूर्त:-
शनिवार २ नोव्हेंबर २०२४ रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी ८-०६ ते ९-३१ शुभ, दुपारी १२-१ ते दुपारी १-४६ चल, दुपारी १-४७ ते ३-११ लाभ किंवा दुपारी ३-१२ ते सायं. ४-३६ अमृत चौघडीमध्ये दिवाळी पाडव्याचे वहीपूजन व लेखन करावे.
बळीची पूजा
आज बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. पुढीलप्रमाणे बळीची प्रार्थना केली जाते.
बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभु ।
भविष्येन्द्रा सुराराते पूजेनंतर प्रतिगृह्यताम् ।।
“हे विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बलिराजा, तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असुरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर.”
अशी प्रार्थना करून बळीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात.
पूर्वी गोकुळवासीयांचा असा समज होता की इंद्र पाऊस पाडतो. म्हणून ते इंद्राची पूजा करीत असत. भगवान कृष्णाने सांगितले की “इंद्र पाऊस पाडीत नसून गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो म्हणून पावसासाठी गोवर्धन पर्वताची पूजा करायला हवी.” पर्वत आणि वृक्ष यामुळे पाऊस पडतो ही गोष्ट मुले आज प्राथमिक शाळेत शिकतात तीच गोष्ट त्याकाळी भगवान कृष्णाने गोकुळवासीयांना सांगितली. म्हणून दरवर्षी कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धत पडली आहे. तसेच या दिवशी अन्नकूट करण्याची प्रथा आहे. गावातील प्रत्येक जण एकेक खाद्यपदार्थ मंदिरात आणतो. आणलेले सर्व अन्नपदार्थ एकत्र ठेवून तो नैवेद्य ईश्वराला अर्पण केला जातो. नंतर सर्व गावकरी एकत्र बसून त्या प्रसादाचे सहभोजन करतात. प्राचीन काळापासून सर्वानी एकत्र येऊन प्रसाद भक्षण करण्याची प्रथा चालू राहिली आहे.
कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कालभैरवाची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळी लहान मुले मीठ घेऊन गावात विक्री करण्यासाठी फिरतात. नूतन वर्षारंभी शुभशकून म्हणून लोक त्यांच्याकडून मीठ खरेदी करतात. ही प्रथा विशेषत: गुजरातमध्ये जास्त करून आढळते.
अक्षर दीपावली
दीपावलीच्या दिवसात सकस साहित्याचे आणि विविध विषयांवरचे दीपावली अंक प्रसिद्ध होत असतात. शंभर वर्षांची परंपरा या ‘अक्षर दीपावलीला’ लाभली आहे. दीपावली अंकांची तयारी जवळ जवळ वर्षभर सुरू असते. लोकही दीपावली अंकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करीत असतात. दीपावली अंकातील लेखनास प्रारंभ करून बरेच लेखक हे मोठे साहित्यिक झाले आहे. आधुनिक काळात इ-दीपावली अंकही प्रसिद्ध होत असतात. सध्या वाचन संस्कृती वाढविण्यासाठी दीपावली अंकांचे मोठे मोलाचे योगदान लाभले आहे.
दीपावलीच्या निमित्ताने शभेच्छापत्रेही लोकप्रिय होत आहेत. मध्यंतरीच्या काळात बरीच शुभेच्छापत्रे पाठविले जात होती. त्याकाळात पोस्टावर खूप ताण पडायचा. परंतु या आधुनिक मोबाइल फोन आणि संगणकाच्या युगात फोन, व्हाॅट्सअप , फेसबुकद्वारे शुभेच्छा पाठविल्या जात असल्यामुळे कागदावरील शुभेच्छापत्रांचे प्रमाण कमी झाले आहे ही एक पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने चांगली गोष्ट म्हणावी लागेल.
दिवाळी पहाट
मला वाटते की विद्याधर निमकर यांच्या चतुरंग संस्थेने ‘दिवाळी पहाट’ हा शब्द प्रथम प्रचारात आणला आणि प्रथम कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या अनेक संस्था दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्यामुळे अनेक कलावंताना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते. दिवाळीच्या दिवशी आणि पहाटे किती श्रोते गाणी ऐकायला येणार ? असा प्रश्न प्रथम संयोजकांना पडला होता. परंतु महाराष्ट्रातील रसिक श्रोते या संगीत दीपावली फराळाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करीत असतात. सध्या केवळ शहरातच नव्हे तर अनेक गावातूनही ‘दिवाळी पहाट’ आयोजित केली जात असते. महाराष्टात दीपावली उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम मदत करीत असतात.
दिवाळीच्या दिवसात बालगोपाळ मंडळी किल्ले करण्यात गुंग असतात. पूर्वी माझ्या लहानपणी मला आठवतेय की माती, दगड आणून किल्ले तयार करीत होतो. आता किल्ल्याचे सुटे तयार भाग विकत मिळतात. ते आणून किल्ले तयार करणे सुलभ झाले आहे. अर्थात सुटे भाग विकत आणून किल्ले करण्यापेक्षा माती-दगड आणून किल्ले तयार करण्यात खूप मोठा आनंद मिळतो हे मात्र खरे आहे.
प्रकाशाचा उत्सव
दीपावली हा ‘प्रकाशाचा उत्सव आहे, दीपज्योत हे बुद्धीचे व ज्ञानांचे प्रतीक आहे. “तमसो मा ज्योतिर्गमय” म्हणजे अंधारापासून मला प्रकाशज्योतीकडे ने. अशी ऋषींनी उपनिषदात प्रार्थना केलेली आहे. पण या कलियुगात आपल्याला दुसरा कोणी प्रकाशाकडे नेणार नाही. आपणच आपल्याला प्रकाशाकडे नेण्यासाठी योग्य दिशेने, कल्पकतेने अथक परिश्रम करावयास हवेत. तरच आपली प्रगती होईल. या जगात यशस्वी होणारे लोक अडचणीतही संधी शोधणारे असतात. आणि अयशस्वी होणारे लोक संधी आली असता अडचणी सांगत बसणारे असतात. ही गोष्ट लक्षात ठेवावयास हवी.
भारतीय संस्कृतींत दिव्याला खूप महत्त्व आहे. दररोज सायंकाळी म्हणावयाची प्रार्थना पहा.-
शुभं करोति कल्याणम् , आरोग्यं धनसंपद: ।
शत्रुबुद्धिर्विनाशाय , दीपज्योति:नमोऽस्तु ते ।।
“हे दीपज्योती आमचे कल्याण कर. आम्हाला आरोग्य आणि धनसंपत्ती दे. आमच्या मनातील शत्रुत्व भावनेचा नाश कर. तुला माझा नमस्कार असो. दीपावली उत्सव हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दु:खाकडून सुखाकडे, अविचाराकडून विचारांकडे, भ्रष्टाचाराकडून नीतीमत्तेकडे, आळसाकडून उद्योगीपणाकडे नेणारा असतो. आजच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणार्या बलिप्रतिपदेच्या दिवशी स्वत:मध्ये चांगला बदल करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करूया. यासाठी प्रथम आपण स्वत:लाच दीपावलीच्या शुभेच्छा देऊया !
दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)