Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

पनवेल दि.१७: रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण होत असून, मार्च 2020मध्ये सुवर्ण महोत्सवी सोहळा होणार आहे. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक व दानशूर व्यक्तींनी यात सहभाग घेऊन योगदान देणे आवश्यक असल्याचे महाविद्यालय विकास समिती चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत अधोरेखित केले. या महाविद्यालयाची स्थापना जून 1970मध्ये पनवेलच्या सरस्वती विद्यामंदिर येथे झाली. याचे पहिले चेअरमन म्हणून स्व. दि. बा. पाटील यांनी काम पाहिले, तर महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य स्व. एम. ए. शेख हे होते. स्थापनेच्या वेळी विद्यार्थीसंख्या फक्त 192 होती. 1974 साली महाविद्यालयाचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर झाले. महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. तशाच प्रकारे आता सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सुवर्ण महोत्सव सोहळा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एन. डी. पाटील, विद्यमान चेअरमन डॉ. अनिल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने योग्य तारीख काढण्यात येणार आहे. या दोन दिवसीय सोहळ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, तसेच येथे शिक्षण घेतलेल्या नामांकित माजी 50 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 1970 साली बांधण्यात आलेल्या या महाविद्यालयाला 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ही इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून, आजी-माजी विद्यार्थ्यांची ऑनलाइन सदस्य नोंदणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याची फी एक हजार रुपये इतकी असणार आहे. इमारत निधीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. प्रारंभी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी सुवर्ण महोत्सवी वर्ष व त्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने सुवर्ण महोत्सव लोगोचे अनावरण, ज्योत रॅली, महाविद्यालयीन सेवकांच्या मदतीने 50 लाख रुपये निधी संकलन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन, विविध कला स्पर्धा, माजी विद्यार्थी मेळावा, विविध इमारतींचा बांधकाम शुभारंभ यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे आजी-माजी चेअरमन, सदस्य, माजी प्राचार्य, देणगीदार, हितचिंतकांचा सत्कार अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या पत्रकार परिषदेला आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, तसेच प्रीतम म्हात्रे, गणेश कडू, उल्का धुरी, संजीवन म्हात्रे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!