रत्नागिरी दि.२५ (सुनिल नलावडे) तालुक्यात गणोशोत्सवात गौरी पुजनालाही तेव्हढेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वतीचे गौरी हे रुप आहे. महिलांनी मंगळवारी दुपार पासुनच गौरी आणल्या व त्याचे विधिवत पुजन केले. विवाहीत महिला आपल्या सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी व कुमारीका आपल्याला चांगले सौभाग्य मिळावे यासाठी गौरी पुजा व्रत करतात. संगमेश्वर तालुक्यात गौरी आवाहन करुन गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी खड्यांच्या रुपात तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे सुंदर साडी,चोळीने सजवुन त्यांची पुजा व आराधना केली जाते. गौरी पुजनात गौरीला गोडाचा तसेच काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो.
दोन दिवस गौराईला गणेशाच्या शेजारी पुजनाचा मान मिळतो. गणपतीसारख्याच गौराईची आरती, गाणी म्हटली जातात. यासाठी महीलाच पुढाकार घेवून गौराईची आराधना करतात. गणेश विसर्जना दिवशीच गणेशाबरोबर गौरीचे विसर्जन केले जाते. २७ तारखेला गणपती व गौरीचे विसर्जन होणार आहे. कोरोना पर्वामुळे यंदा या उत्सवाला शांततेचे स्वरुप आले असले तरी पंरपरा पाळली जात आहे हेच या उत्सवाचे महत्व आहे.