अलिबाग दि. 26: रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि.24 ऑगस्ट रोजी  सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास  कोसळून दुर्घटना घडली.     
       या इमारतीमध्ये एकूण 41 सदनिका, 1 कार्यालय, 1 जिम, 1 मोकळा हॉल होता.
       A विंग मध्ये एकूण 21 सदनिका होत्या. यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची संख्या 54, सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या 41 आणि प्राथमिक अंदाजानुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची संख्या 13 होती.
       B विंग मध्ये 20 सदनिका होत्या. यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची संख्या 43, दुर्घटनेवेळी सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या 37 आणि प्राथमिक अंदाजानुसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची संख्या 6 होती.
       अशा प्रकारे तारिक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील एकूण 41 सदनिकांमध्ये राहत असलेल्या 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप बाहेर पडू शकल्या. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 19 व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.
        दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सुरेश काशिद, श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी, तळा तहसिलदार आण्णाप्पा कनशेट्टी,  जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार विशाल दौंडकर,  महाड वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर जगताप, महाड नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील, महाड नायब तहसिलदार प्रदीप कुडोळ, अरविंद घेमूड, पोलादपूर नायब तहसिलदार देसाई तसेच स्थानिक प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी  धाव घेतली. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक व त्यांचे इतर सहकारी अधिकारी-कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातून समन्वय साधत होते.
       संपूर्ण परिस्थिती लक्षात घेवून पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी घटनास्थळावरील सर्व यंत्रणांशी समन्वय साधला व आवश्यक ती निर्णय प्रक्रिया तातडीने राबविण्यास सुरुवात केली.
      मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पालकमंत्री आदिती तटकरे,खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सतत संपर्कात होते. त्यांच्याकडून मदतकार्याचा वेळोवळी आढावा घेवून मदतकार्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे सांगण्यात आले.
      पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना झाली. त्यांच्या जलद प्रवासासाठी प्रशासनाने ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली.
      माणगाव, पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, ॲम्ब्युलन्स, जनरेटर, जेसीबी, डंपर, पोकलेन, पाणी, बिस्किटस्, तसेच इतर आवश्यक साहित्य तातडीने दुर्घटनास्थळी पाठविण्यात आले. त्याचबरोबर एल ॲण्ड टी चे व्यवस्थापक श्री.नायडू, रिलायन्स कंपनी नागोठणे, पोस्को कंपनी, महाड मॅन्युफॅक्चरींग असोशिएशन (एमआयडीसी महाड) या सर्वांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांच्या चहा, पाणी, नाश्ता, जेवणाची तसेच आवश्यक यंत्र सामुग्रीची व्यवस्था करण्यात आली.
        दुर्घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तसेच साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम, महाड सीस्केप या व अन्य काही स्वयंसेवी संस्थांनी युद्धपातळीवर बचाव व शोधकार्य केले.
       तसेच प्रशासनाने रक्तदानासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना स्थानिक नागरिकांमधून अवघ्या चार तासात शंभर जणांनी रक्तदान केले.
        मेडिकल कॅम्प साठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व  उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील  ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ यांच्यासह सज्ज ठेवण्यात आले होते.
      पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय. पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आवश्यकता भासल्यास महाड दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले होते.
      रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या समन्वयातून जिंदाल स्टील हॉस्पिटल महाड दुर्घटनेतील जखमींच्या उपचारार्थ सज्ज ठेवण्यात आले होते.
       जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन केले.
      जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
       दरम्यान दि.24 ऑगस्ट 2020 रोजी 8 व्यक्ती बाहेर पडताना जखमी झाल्याने त्यापैकी 7 व्यक्तींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले होते व नंतर त्यापैकी 5 व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर एका व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराने झाला.
     जखमी व्यक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे:-
1) नमिरा शौकत अलसुरकर, वय 19 वर्षे, 2) संतोष सहानी, वय 24 वर्ष,  3) फरीदा रियाज पोरे, 4) जयप्रकाश कुमार, वय 24 वर्ष, 5) दिपक कुमार, वय 21 वर्षे, 6) स्वप्निल प्रमोद शिर्के, वय 23 वर्ष, 7) नवीद हमीद दुष्टे, वय 32 वर्षे,  8) मोहम्मद नौसीन बांगी, वय वर्ष 4,  9) मेहरुन्निसा अब्दुल हमीद काझी, वय वर्ष 60.
      या दुर्घटनेतील मृत व्यक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे:-
1) सय्यद हसीम समीर, वय 45 वर्ष, 2) नविद झमाने, वय 30 वर्ष, 3) नौसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष, 4) आदील हसीम शेखनाग, वय 14 वर्ष, 5) मतीन मुकादम, वय 45 वर्ष,  6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष, 7) ईस्मत हसिम शेखनाग, वय 38 वर्ष, 8) फातिमा अन्सारी, वय 60 वर्ष, 9) अल्तमश बल्लारी, वय 27 वर्ष, 10) शौकत आदम अलसूलकर, वय 50 वर्ष, 11)  आयशा नौसिन बांगी, वय वर्ष 7, 12) रूकया नौसिन बांगी, वय 2 वर्ष,  13) फातिम शौकत अलसुलकर, वय 60  वर्ष, 14) अब्दुल हमीद काझी वय 58 वर्ष, 15) हबीबा हाजवारे, वय 80 वर्ष, 16)  कामरूनिसा अन्सारी, वय 63 वर्ष.
      या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना मदत व पुनर्वसन  विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.
       याशिवाय या दुर्घटनेत  उध्वस्त झालेल्या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून ती मदत तातडीने देण्याचे  निश्चित प्रयत्न केले जातील, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घाेषित केले.
     अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारिक गार्डन या इमारतीच्या दि.24 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर  तातडीने सुरू करण्यात आलेले  शोध व बचाव कार्य आज दि.26 ऑगस्ट 2020 रोजी पूर्ण झाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!