पनवेल, दि.१: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना विविध बदलांचा स्वीकार करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेने अश्वासक पाऊल उचलेले असून यासाठी मूर्तीदान, शाडू मूर्त्यांना पसंती देणे अशा अनेक उपायांचा अवलंब करावा लागणार असल्याची माहिती कैलास गावडे यांनी दिली.
महापालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळे, मूर्ती कारखानदार यांची बैठक दिनांक ३० जून रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहांमध्ये घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपायुक्त गणेश शेटे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, अधिक्षक जयराम पादीर, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे, महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे यांनी पर्यावणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने केलेल्या तयारी विषयी माहिती देताना सांगितले, पर्यावणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीकरिता १ जुलैपासून सोशल मीडियावर जनजागृती करण्यात येणार आहे. याकरिता १ शॉर्ट फिल्म, १ जिंगल, आणि आयुक्त यांच्यातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पालिकेतर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा व घरगुती गणेश सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात येणार आहे.
उपायुक्त गणेश शेटे यांनी यावेळी गणोशोत्सवासाठी महापालिका एक खिडकी योजना राबविणार असल्याचे सांगितले. गणोशोत्सवासाठी लागणारा परवाना यावर्षी ऑनलाईन पध्दतीने देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिकेच्यावतीने चारही प्रभागातील गणेश मंडळांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. सिडकोशी संबंधित गणेश मंडळाचे प्रश्न, महापालिका सिडकोशी समन्वय साधून सोडविल.त्यासाठी महापालिकेच्यावतीने येत्या काही दिवसांत पुन्हा गणेश मंडळांची बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
महापालिका माझी वसुंधरांतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवित आहे. ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ हा यातील एक महत्वाचा उपक्रम यावर्षी महापालिकेने हाती घेतला आहे. महापालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचे आवाहन केले आहे.

मूर्तिदान केंद्र उभारणार
या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिका आपल्या घरी येऊन 'श्री' मूर्ती जमा करणार आहे. जमा होणाऱ्या श्रींच्या मूर्तीचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिका गणेशभक्तांसाठी विसर्जन व गणपती दान मोबाईल ॲप्लिकेशन घेऊन येत आहे. यामध्ये विसर्जनाची वेळ व ठिकाण निश्चित करून गणेशभक्त आधीच नोंदणी करू शकतील. गणपती मूर्ती दान करायची असल्यास त्याची नोंदणी करता येणार आहे.

मा.मुख्यमंत्री महोदयांनी ५ जून रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे, आपण सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जीवनपध्दती अंगिकारली पाहिजे. जसे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती ऐवजी शाडू मातीची मुर्ती घेणे, नदी व तलावांमध्ये मुर्तीचे विसर्जन न करता इतर पर्यायांचा वापर करावा. आपण सर्वजण मिळून गणोशोत्सव आनंदात साजरा करूया व पर्यावरणाचे रक्षण करूया.
गणेश देशमुख, आयुक्त,पनवेल महानगरपालिका

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना:
1.गणेशोत्सवामध्ये सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर टाळावा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठ्या आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते.
२.नैसर्गिकरंग वापरून कागदाच्या लगद्यापासून तसेच शाडूच्या मातीपासून गणपतीच्या सुंदर मूर्ती बनविल्या जातात. या मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळतात.
३.निर्माल्य व गणेशमूर्ती नदीत विसर्जित न करता निर्माल्य कलश व गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रीम हौद अशा पर्यायाचा वापर करावा.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!