महापालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच यावर्षी केवळ तीन महिन्यात 135 कोटी रुपयांचा कर वसूली झाली आहे.
पनवेल,दि.४ : पनवेल महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या तीन महिन्यात मालमत्ता करात 135 कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. मालमत्ता कर विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 30 जूनपर्यंत 46 हजार 154 मालमत्ता धारकांनी अवघ्या तीन महिन्यात 135 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाद्वारे सुविधा दिलेल्या महानगरपालिका वेबसाइट www.panvelcorporation.com वरील लिंक्स आणि ‘PMC TAX APP’ या मोबाइलॲप्लीकेशनमुळे देयकांच्या डिजिटल पद्धतींद्वारे संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. याला मालमत्ताधारकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे.
नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरता यावा तसेच महानगरपालिकेच्या कार्यालयात ये-जा करावी लागू नये यासाठी मागीलवर्षी पनवेल महानगरपालिकने ‘PMC TAX APP’ विकसित केले होते. या ॲप तसेच वेबसाईटवरील मालमत्ता कराच्या लिंक अशा डिजीटल माध्यमातून देयक भरण्याच्या संख्येत दिवेंसेदिवस वाढ होताना दिसते आहे. तसेच डिजीटल पध्दतीने कर भरणा केल्यास दोन टक्के सूट असल्याकारणानेही डिजीटल पध्दतीद्वारे देयक भरणाऱ्यामध्ये वाढ होताना दिसते आहे. आतापर्यंतच्या एकूण संकलनापैकी सुमारे 41 हजार 824 नागरिकांनी एकुण मालमत्तांकरापैकी 110 कोटी रुपये डिजीटल पध्दतीने भरले आहेत.
महापालिका हद्दीमध्ये सुमारे साडेतीन लाख नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त मालमत्ता कर भरावा यासाठी गतवर्षी विभागातर्फे विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, नोटीस, अशा विविध उपाययोजना राबविल्या होत्या. यावेळी चालू आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस पोस्टाद्वारे तसेच ज्या मालमत्ताकर धारकांचे रजिस्ट्रेशन झाले आहे अशा करदात्यांना ईमेल व मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे देयक पाठविण्यात आले आहेत. याबरोबरच मॅन्युअली बिलाचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. वेबसाईटवरतीही मालमत्ता देयकांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. याबरोबर यावर्षी थेट वसुलीसाठी व जप्तीच्या नोटीसा देण्यासाठी चार प्रभागांमध्ये आठ वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच येत्या काळात वाणिज्य, औद्योगिक व निवासी मालमत्तांवर देखील जप्तीची कारवाई प्रस्तावित आहे. महापालिका अशा विविध प्रयत्नांमुळे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत 135 कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. नागरिकांना मालमत्ताकरांबाबत काही अडचणी असल्यास 18005320340 या टोल फ्री क्रमांकारवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.