पनवेल,दि.४ : पनवेल महानगरपालिका व बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून जैवविविधता संवर्धनपर उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी व याच्या जनजागृतीसाठी रविवार दिनांक ३० जून रोजी “एक घोंसला चिड़ियों के लिए” ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणारे फिडर महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांना टांगण्यात आले.
यावेळी आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुते, संचालिका संगीता विसपुते, पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे विभाग प्रमुख मनोज चव्हाण, यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्या व इतर पक्ष्यांची संख्या घटणे हा चिंताजनक विषय आहे. माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत श्री. बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन, पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “एक घोंसला चिड़ियों के लिए” ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह्या उपक्रमांतर्गत चिमण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करण्यात आली. चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणारे फिडर महाविद्यालय परिसरात असलेल्या प्रत्येक झाडावरती चिमण्यांसाठी घरटे टांगण्यात आले.
श्री. बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन व पनवेल महानगर पालिका यांच्यात नुकताच पर्यावरण जनजागृती व संवर्धन विषयी सामंज्यस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत महापालिका व विसपुते महाविद्यालय यांच्यावतीने विविध पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व भविष्यातही अशा प्रकारचे अनेक उपक्रम या अंतर्गत राबविण्यात येणार आहे.