पनवेल दि.02: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नाका ते टपाल नाक्यादरम्यानच्या मार्केट परिसरातील गर्दीचे नियोजन करण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर आणि व्यापारी प्रतिनिधींची नुकतीच सविस्तर बैठक झाली. टपाल नाका ते उरण नाका परिसरातील गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. या गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे तसेच कोरोनासंदर्भामधील गंभीरता सर्वसामान्य लोकांना कळत नसल्यामुळे आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली, तसेच विभागनिहाय त्या त्या ठिकाणची मार्केट खुली करून लोकांनी आपापल्या विभागातीलच मार्केटमध्ये खरेदी करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी बाळगण्यासाठी उपाययोजना करण्याचेही या वेळी ठरले.