ठाणे दि.२८ (दा. कृ. सोमण) दीपावली हा सण तीन हजार वर्षांपासून साजरा केला जात आहे. पूर्वी दीपावलीला ‘यक्षरात्री’ असे म्हणत असत. त्यानंतर ‘दीपमाला‘ या नावाने दिवाळीचा सण ओळखला जाई. त्यानंतर काही ठिकाणी या सणास ‘दीपप्रतिपदुत्सव’ असे म्हणत असत. भविष्योत्तर पुराणात दिवाळीचा ‘दीपालिका’ असा उल्लेख आहे. काल्विवेक ग्रंथात ‘सुखरात्री’ व व्रत प्रकाश ग्रंथामध्ये दीपावलीचा उल्लेख ‘सुख सुप्तिका’ या नावाने केलेला आहे. या आधुनिक कालात हा सण ‘चैतन्याचा उत्सव’ म्हणून साजरा केला जात असतो. घर-परिसराची स्वच्छता, अभ्यंगस्नान, दिव्याचा प्रकाश, रांगोळी, तेल-तुपातील गोड पदार्थ सर्वगोष्टी उत्साहाचे वातावरण निर्माण करीत असतात.
गोवत्स द्वादशी
आज सोमवार २८ ॲाक्टोबर रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने या दिवशी गोवत्स द्वादशी, वसुबारस साजरी करावयाची आहे. गोवत्स द्वादशी – वसुबारस या दिवशी एकभुक्त राहून सकाळी किंवा सायंकाळी गाईची वासरासह पूजा करण्यास सांगण्यात आले आहे. गाय- वासराची पूजा करून त्यांना गोड जेवण देण्याची पद्धत आहे. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने आपण दिवाळी साजरी करण्यापूर्वी गोमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.
गोवत्सद्वादशीलाच कोकणात वसूबारस असे म्हणतात. गोवत्सद्वादशी हे एक व्रत आहे. महिला हे व्रत करतात. या दिवशी एकवेळ भोजन करून सायंकाळी गाय-वासरू यांची पूजा करतात. त्यावेळी पुढील प्रार्थना करतात.
तत: सर्वमये देवि सर्वदेवैरलड्.कृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नन्दिनि ॥
हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.
भारत हा शेतीप्रधान देश आहे. गाय, वासरू, बैल या उपयुक्त प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पूजन करण्याची आपली परंपरा आहे. गोवत्सद्वादशीच्या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक हे खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. उत्तर भारतात या व्रताला ‘बछवॅांछ’ असे म्हणतात. देव- दानवांच्या समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातल्या ‘नंदा’ नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केले जाते. भारतासारख्या शेतीप्रधान देशात आपण दीपावलीचा सण साजरा करण्यापूर्वी गोठ्यातील गाय-वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करून त्याना गोड पदार्थ खावू घालायचे.

💥पोटे मसाले तर्फे दिवाळीच्या शुभेच्छा

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!