पनवेल, दि.4 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक दिवसापासून अनेक समस्या नागरिकांमध्ये भेडसावत आहेत. या समस्यांविरोधात आज काँग्रेस पक्षाने पनवेल महानगरपालिका कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, जेष्ठ नेते शशिकांत बांदोडकर, मा.नगरसेविका शशिकला सिंग, निर्मला म्हात्रे, शहराध्यक्ष लतीफ शेख, अरुण कुंभार, आदम दलाईत, जयेश लोखंडे, शाहीद मुल्ला आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पनवेल महानगरपालिका तसेच राज्य सरकारविरोधात निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. पनवेल महानगरपालिका सर्वसामान्य नागरिकांसाठी पिण्याचे पाण्याचा प्रश्‍न ही प्राथमिकता असून त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात तसेच खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या शहरामध्ये जेवढे एमएलडी पाण्याची गरज आहे त्याहून कमी पाणी का सोडले जाते या संदर्भात आपण माहिती द्यावी व उपाययोजना करावी, अशी मागणी केली. तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात निकृष्ट नाले व रस्त्याची निपक्षपाती पणे चौकशी करावी व निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकादारांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेली अनेक वर्ष वाढीव मालमत्ता करा संदर्भात अनेक मोर्चे निघून सुद्धा कोणत्याही प्रकारचे नागरिकांचे समाधान झालेले नाही तरी आपण या विषयावर मुख्यमंत्री महोदय, नगरविकास मंत्री महोदय यांच्या समवेत संयुक्त बैठक आयोजित करून कायमस्वरूपी या मुद्दा निकाली काढण्यात यावा. त्याचप्रमाणे नोकर भरतीमध्ये पनवेलकरांना प्राधान्य मिळत नाही अशी तक्रार जनतेकडून वारंवार येत आहे तरी पनवेलकरांना महापालिका क्षेत्रातील विविध नोकर भरतीत प्राधान्य द्यावे व रोजगार उपलब्ध करून द्यावा. अर्थसंकल्पात महिला, शिक्षण, आरोग्यासाठी भरीव तरतूद न केल्याने नाराजी व्यक्त केली. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही एस. आर.ए योजेनेप्रमाणे राबवावी. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिव्यांग बांधवांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!