पनवेल,दि. 8 : यावर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल 2024 महिन्यापासून ते आज दिनांक 04 मार्च पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव आर्थिक स्त्रोत असून गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता लवकरात लवकर भरावा असे आवाहन करण्यात येत असून याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत 341 कोटीहून अधिक रूपयांची भर पडली आहे.
दिनांक 31 मार्च ही मालमत्ता कर भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे व मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दरमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात आपला मालमत्ता कर भरत असून गेल्या चार दिवसापासून दररोज महापालिकेच्या तिजोरीत 1 कोटीहून अधिक रक्कमेची भर पडत आहे. यामध्ये 1 मार्च पासून आज दिनांक 4 मार्च पर्यंत एकुण भरणा 5 कोटी 56 लाखाचा भरणा झाला आहे.
त्याचप्रमाणे मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. या ॲपमध्ये नाव बदलाकरता रिक्वेस्ट केल्यास महापालिकेकडून नाव बदलानंतर संबधितांस नोटिफिकेशन मिळणार आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने ‘PMC TAX APP’ विकसित केले आहे तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा तसेच मालमत्ताकराबाबत काही शंका असल्यास त्यांनी 1800 5320340 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाच स्त्रोत आहे. महापालिकेची विविध विकास कामे सध्या सुरु असून महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरून महापालिकेस सहाकार्य करावे.
स्वरूप खारगे – सहाय्यक आयुक्त, पनवेल महानगरपालिका