पनवेल दि.११: शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज ‘स्काऊट-गाईड निसर्ग शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय निसर्ग शिबिरात ध्वजारोहण, तंबू सजावट, बिनभांड्याचा स्वयंपाक, मनोरंजनात्मक खेळ, शेकोटी, सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदुताई घरत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, उद्योजक वैभव देशमुख, प्रा.संतोष चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या संचालिका वर्षा ठाकूर यांनीही या शिबिरास सदिच्छा देऊन शिबिराच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त समाजसेवा, स्वयंशिस्त, स्वावलंबन, श्रममूल्य व इतर मुल्यांची रूजवणूक करण्यात आली. तसेच ‘परिसर स्वच्छता’ व ‘पर्यावरण संवर्धन’ या संबंधित वेगवेगळया उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी झेंडागीत, प्रार्थना, स्फुर्तीगीत, तंबू सजावट, शेकोटी कार्यक्रमाचे सादरीकरण केले.