पनवेल दि.३०: पनवेल पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. आज पनवेल पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी भाजपच्या देवकीबाई कातकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. देवकीबाई यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे देवकीबाई कातकरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. स्थापनेपासून या पंचायत समितीवर शेकापची सत्ता राहिली आहे. पहिल्यांदाच सत्तापालट होत पंचायत समितीवर भाजपचा झेंडा डौलाने फडकला आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.