महाअंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट २५ एकांकिकांची निवड
विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’
सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने होणार सन्मान
परीक्षक म्हणून सुकन्या मोने, देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी काम पाहणार

पनवेल दि.०२: दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टीआयपीएल तर सहप्रायोजक निल ग्रुप आहेत. यंदा या स्पर्धेचे ११ वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांना पुढे माहिती देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, मराठी रंगभूमीला गेली अनेक वर्ष अनेक चांगले कलाकार अभिनेते दिग्दर्शक लाभले. त्यांनी त्या काळात त्यांच्या मेहनतीवर मराठी रंगभूमी यशस्वीरित्या उभी केली, वारसा पुढे वाढवला. अशाच काही कलाकारांचा गुणगौरव हा अटल करंडकच्या रंगमंचावर करण्यात येतो. अटल करंडकच्या ८ व्या वर्षी पासून “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर, ज्येष्ठ अभिनेते कै. जयंत सावरकर, प्रसिद्ध अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना गौरविण्यात आले आहे. यंदा प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व ५० हजार रुपये पन्नास हजार असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
गेली दहा वर्षे चाललेल्या अटल करंडक स्पर्धेने टप्प्याटप्याने उच्चांक गाठला आहे. कोरोना काळातही एवढ्या मोठ्या स्तरावर अटल करंडक ही एकमेव स्पर्धा होती जी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरीत्या संपन्न झाली, स्पर्धेच्या ८व्या वर्षी कोरोना चे सर्व निर्बंध पाळत कोरोना काळातही प्राथमिक फेरीसाठी जवळपास १०६ संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी देखील अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला प्राथमिक फेरीसाठी १०८ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १४ डिसेंबर २०२४ पासून विभागनिहाय प्रारंभ झाला, जळगाव व नागपूर केंद्र, पुणे सातारा केंद्र, कोल्हापूर केंद्र, रायगड (पनवेल) केंद्र, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या केंद्रांवर संपन्न झाली. प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून आशीर्वाद मराठे आणि मानसी दोषी मराठे यांनी हि कामगिरी यशस्वीरित्या पार पाडत महाअंतिम फेरीसाठी सर्वोत्कृष्ट अशा २५ एकांकिकांची निवड केली आहे. निवड झालेल्या संघाची महाअंतिम फेरी १०,११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे, असून परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, प्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी हे काम पाहणार आहेत.
एकांकिका स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच कोणत्यातरी एकांकिका स्पर्धेचा “ब्रॅण्ड अॅम्बेसिडर” अशी एक नाविन्यपूर्ण संकल्पना सुरु करण्यात आली . अटल करंडक मधून जो कलाकार विजेता आहे आणि आज तो यशस्वीरित्या या क्षेत्रात कार्यरत आहे अशा एका कलाकाराला आम्ही ‘ब्रँड अॅम्बेसिडर” चा मान देण्याचे ठरविले होते त्यानुसार सुप्रसिद्ध अभिनेता “ओंकार भोजने” याची नियुक्ती बँड अॅम्बेसिडर म्हणून अटल करंडक च्या ८ व्या वर्षासाठी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ९ व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम, निरागस विनोदीवीर “पृथ्वीक प्रताप” यांची, मागील वर्षी म्हणजेच १० व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेता सि के टी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि अटल करंडक आणि मल्हार करंडक मधील स्पर्धक अजिंक्य ननावारे यांची निवड करण्यात आली होती. या वर्षी सुप्रसिद्ध बिग बॉस फेम, माझ्या नवऱ्याची बायको फेम आणि अटल करंडक ची २०१८ ची स्पर्धक अभिनेत्री “रुचिरा जाधव” ‘ब्रँड अॅम्बेसिडर” आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अटल करंडक एकांकीका स्पर्धेमध्ये एकूण रुपये २ लाख ७० हजाराची मुख्य पारितोषिके आणि ३८ हजार रुपयांची वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतात. तसेच प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशी मिळून ४ लाखाची पारितोषिके देण्यात येतात. प्रथम पारितोषिक ०१ ;लाख रुपये प्रमाणपत्र व मानाचा अटल करंडक, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक, चतुर्थ पारितोषिक २५ हजार रुपये प्रमाणपत्र व चषक तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिकअसून त्यांना १० हजार रुपये प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेला १५ हजार रुपये, तसेच वैयक्तिक गटात उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, नेपथ्य, संगीत, लाईट, लेखक आणि दिग्दर्शक, विनोदी कलाकार, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार यांनाही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने पनवेल मधील दिवंगत लोकप्रिय नाट्य कलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे, अशीही माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, मल्हार महोत्सवाच्या निमित्ताने एकांकिका स्पर्धा सुरु झाली. ती गेल्या १० वर्षात अटल करंडकच्या रूपाने राज्यस्तरीय स्पर्धा झाली. कोरोनाच्या काळात आयोजन करणारी आणि यशस्वी अशी एकमेव स्पर्धा ठरली. कलाकारांना व्यासपीठ आणि सन्मान देण्याचे काम या स्पर्धेतून होत आहे, याचे आम्हाला आयोजक म्हणून समाधान आहे. सीकेटी महाविद्यालयाचे कला क्षेत्रात असलेले काम आणि सहभागामुळे स्पर्धा परिपूर्ण झाली असून त्याचबरोबरीने टीम अटल करंडक मेहनत घेऊन काम करत आहे. या स्पर्धेच्या नियोजनाचे नेहमीच कौतुक होत असून यशस्वीतेमुळे अटल करंडकला प्रतिष्ठा प्राप्त झाली. निल गुपचे विलास कोठारी व कल्पना कोठारी, पनवेल महापालिका, कलाकार आणि रसिकांचा नेहमीच पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहिला असून त्या अनुषंगाने कार्यशाळा तसेच प्रशिक्षण वर्गही यापूर्वी घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्यामनाथ पुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले कि, “रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा” हे ब्रीद वाक्य घेऊन गेली १८ वर्ष पनवेल मध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आधी सात वर्ष ही स्पर्धा “मल्हार करंडक” या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली जात होती. गेली १० वर्ष ही स्पर्धा “अटल करंडक” या नावाने राज्यस्तरीय स्वरूपात आयोजित केली जात आहे. यंदाचे ह्या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. नाटय चळवळ वृद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो, असेही त्यांनी सांगितले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!