कळंबोली दि.२२: बालपणीचे मित्र अनेक वर्षांनी भेटणे हा सुद्धा एक आयुष्यातला दुग्ध शर्करा योग असतो.असा योग सोशल मीडिया अन हायटेक प्रणालीमुळे पेण तालुक्याच्या विद्यालयातील पंधरा वर्षांपूर्वीच्या जिवलग मित्र मैत्रिणींनी एकत्र येऊन आनंद द्विगुणीत केला आहे. पेण तालुक्यातील रावे गावातील सुधागड एज्यूकेशन सोसायटी पालीचे सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर येथे इयत्ता दहावी २०१० मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
शाळेच्या सभागृहात प्रार्थनेने ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापक सोपान शेंडगे यांनी दीप प्रज्वलन केले. त्यानंतर विद्येची देवता गणपती,सरस्वती देवी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त इयत्ता दहावी २०१० मध्ये शिकलेले ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते व सगळ्या विद्यार्थ्यांना ज्या गुरुजनांनी ज्ञानाचे धडे शिकवले ते सर्व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आपण शाळेचे काही देणे लागतो या उद्देशाने शाळेतील सध्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत शिकता येईल म्हणून शाळेमध्ये प्रोजेक्टर भेट देण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालमित्रांशी व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी शाळेत घडलेले जुने किस्से व काही घटनांना उजाळा देण्यात आला. जमलेल्या मित्र-महिणी मैत्रिणींनी आपापल्या आयुष्यातील चढ-उतार आनंदाचे क्षण एकमेकांना सांगून मनाला उभारी दिली. शाळेतील त्यावेळच्या आठवणी काही मित्र आणि मैत्रिणींना दाटूनही आल्या.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या समवेत स्नेहभोजन केले. विद्यार्थ्यांनी शाळेत असतांना खेळलेले खेळ खेळण्यात आले. साधारण पंधरा वर्षातून सर्व एकत्र आल्यामुळे सर्वांनी या दिवसाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाची सांगता होताना सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले सर्वांनी आपल्या बालमित्रांच्या भेटी घेऊन वंदे मातरम गीताने या कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सोपान शेंडगे, स्थानिक शाळा समितीचे सचिव अरुण पाटील, मनोज पाटील,बी.एस.पाटील, एस. के .ठाकूर, एम. टी. पाटील, पी.आर .पाटील, आर .डी .पाटील, व्ही बी पाटील, व्ही. एस .पाटील, नंदकुमार कुंभार व शाळेतील माजी शिपाई प्रसाद पाटील उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी विशाल पाटील यांनी केले. हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी प्रवीण पाटील, प्रकाश पाटील ,सचिन माळी वैभव पाटील, नितेश पाटील, दिपू पाटील, तृप्ती पाटील, सिमा पाटील, अश्विनी पाटील, सुरज पाटील, कल्पिता पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
![]()
