उलवा, ता. १६: आम्ही भूमिपुत्र गावाभोवती असणाऱ्या माळरानावर बिनधास्त खेळत होतो, गावोगावी हजारो एकर गुरचरण जमीन होती, मैदाने होती. आज सिडकोने फक्त काँक्रिटचे जंगल निर्माण करून भूमिपुत्रांची कोंडी केली आहे. आम्हा भूमिपुत्रांच्या हजारो एकर गुरचरण जमिनी सिडकोने अक्षरशः फुकटात लाटल्या आहेत. आज मुलांना खेळायला जागाच नाही. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील ९५ गावांना मैदाने मिळालीच पाहिजेत, अशी आग्रही मागणी गुरुवारी हुतात्मादिनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी जासई येथे केली. ते पुढे म्हणाले, “भूमिपुत्रांच्या राहत्या घरांवर बुलडोझर फिरविण्याची सिडकोची भूमिका निषेधार्ह असून हे खपवून घेतले जाणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिलेच पाहिजे, कारण दि. बा. पाटील साहेब हे नि:स्वार्थी आणि बहुजन समाजाचे नेते होते. त्यांच्यामुळेच साडेबारा टक्के विकसित जमिनीचा कायदा लागू झाला.”
१९८४ मध्ये शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन झाले. त्यात पाच हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांना जासई येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी महेंद्रशेठ बोलत होते.
दिबांचे पुत्र अतुल पाटील यांनी एका वर्षात प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत तर आपण आत्मक्लेष आंदोलन करू, असे मत व्यासपीठावर व्यक्त केले. त्याची दखल सर्वच लोकप्रतिनिधींनी घेत ‘ही वेळ येणार नाही’, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री गणेश नाईक होते. त्यांनी महेंद्रशेठ घरत यांनी केलेल्या मागण्या रास्त असून येत्या दोन महिन्यांत त्यावर सांगोपांग चर्चा करून निश्चितच सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी भूमिपुत्रांचे प्रश्न वेळीच सुटणे गरजेचे आहे, असे मत मांडले.
हुतात्मा दिनानिमित्त चिर्ले येथे नामदेव शंकर घरत, तर धुतूम येथे रघुनाथ अर्जुन ठाकूर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून महेंद्रशेठ घरत यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
पनवेलच्या महात्मा ज्योतिबा फुले आर्टस, सायन्स आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.