पनवेल दि.21: दरमहा १०० कोटी रुपये खंडणी वसुलीचे पोलिसांना टार्गेट देऊन महाराष्ट्राला आणि पोलिसांच्या कर्तृत्वाला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पनवेल भाजपच्यावतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी ‘महाराष्ट्रातील पोलिसांना बदनाम करणाऱ्या अनिल देशमुखांचा धिक्कार असो’, ‘महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो’, ‘वसुली महाआघाडी सरकारचा निषेध असो’, ‘तीन तिघाडा काम बिघाडा’, ‘महाविकास आघाडी सरकार वसुली सरकार’, अशा गगनभेदी घोषणा देत गृहमंत्री अनिल देशमुख व महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला.