पनवेल,दि.1 : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघरमधील सेक्टर १२ येथील आरोग्य वर्धीनी केंद्रामध्ये आज 1 मे पासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ कार्यान्वित करण्यात आला. या दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी १०:०० वाजता दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले. याठिकाणी बाह्य रुग्ण सेवे बरोबरच येथे येणाऱ्या रूग्णांची मोफत तपासणी,मोफत उपचार तसेच त्यांना मोफत औषधे देण्यात येणार आहे.
‘आपला दवाखान्याची’ फित कापून आमदार प्रशांत ठाकुर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
यावेळी आमदार प्रशांत ठाकुर, आयुक्त गणेश देशमुख, उपसंचालक प्रतिनिधी डाॅ. सोनावणे, उपायुक्त सचिन पवार ,मुख्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. आनंद गोसावी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक आयुक्त डाॅ.वैभव विधाते, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. गीते, माजी नगरसेवक, खारघर विभागाचे भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिपरीचारिका, आशा वर्कर, पालिका अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांनुसार पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात खारमधील सेक्टर १२ येथील आरोग्य वर्धीनी केंद्रात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आज पासून कार्यरत करण्यात आला आहे. शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे, नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या मर्यादित वेळेमुळे काही झोपडपट्ट्यातील सदृश्य भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहे. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी , विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरिता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची स्थापना करण्यात आली आहे.
‘आपला दवाखान्यामध्ये’ बाह्य रुग्ण सेवा वेळ दुपारी २:०० ते रात्री १०:०० पर्यंत असणार आहे. तसेच मोफत औषध उपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी व लसीकरण तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी या दवाखान्यात होणार आहे. बाह्ययंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आवश्यकतेनुसार व विशेष तज्ज्ञ संदर्भ सेवा इत्यादी सेवाही देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी आनंद गोसावी यांनी सांगितले.