पनवेल दि.०२: रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅकचा ए+ दर्जा मिळाला आहे. याबद्दल दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकवर्गाने महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आज अभिनंदन केले.
कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली केली. यातूनच पनवेल येथे १९७० साली महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय उभे राहिले. अनेक जण या महाविद्यालयात शिकून सध्या मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. गेल्या वेळी या महाविद्यालयाला नॅकचा ए दर्जा मिळाला होता. या वेळी त्यात सुधारणा होऊन आता ए+ दर्जा प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मंगळवारी भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. या वेळी उपप्राचार्य आर. ए. पाटील, नॅक समन्वयक प्रा. सोपान गोवे, ग्रंथपाल एस. एस. औचिते उपस्थित होते.
मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयालाही नॅक पुनर्मूल्यांकनात ए+ दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी तो बी असा होता. आदिवासीबहूल परिसरात १९८४ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पूर्ण नूतनीकरण केले. या लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या भव्य व सुसज्ज इमारतीचा लोकार्पण सोहळा अलिकडेच ०८ एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर आता या महाविद्यालयाला नॅकचा ए+ दर्जा मिळाला आहे.
या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य एल. डी. भोर, उपप्राचार्य एस. ई. सैंदनशिव, एस. जी. मेंगाळ, नॅक समन्वयक ए. एन. चांदोरे यांच्यासह विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन अभिनंदन केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन्ही महाविद्यालयांना नॅकचा ए+ दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून प्राचार्य व सहकार्यांचे कौतुक केले.
मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य एल. डी. भोर म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने मी राम पाहिला. त्यांच्या दातृत्वाने महाविद्यालयाची भव्य नवी इमारत उभी राहिली असून हे यश मिळाले आहे, तर पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी, विद्यार्थी म्हणून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवर, माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.