भांडूप, दि.१५: महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या सूचनेनुसार व भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, भांडूप परिमंडलात डिसेंबर २०१९ पासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. ६२२ वीजचोरांवर कारवाई करून जवळपास १ कोटी ८५ लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. भांडूप परिमंडलात येत असलेल्या ठाणे, वाशी व पेण या तीनही मंडल कार्यालयांतर्गत गेल्या महिनाभरा पासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली असून ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक नाळे यांनी दिले होते. त्यानुसार मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती देण्यात आली असून मुख्य अभियंता चव्हाण स्वतः या मोहिमेबाबतची सद्यस्थितीबद्दल नियमितपणे पाठपुरावा करत आहेत. या मोहिमेत दिनांक १ डिसेंबरपासून ६२२ जणांकडून वीजचोरी उघडकीस आली आहे. त्यातील ४९१ वीजचोरांविरुद्ध वीज कायदा नुसार तर १३१ जणांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. मीटरशी छेडछाड किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी असे प्रकार आढळून आले आहेत. १ डिसेंबर पासून झालेल्या वीजचोरीमध्ये जवळपास १४ लाख युनिट्सची वीजचोरी उघडकीस आली आहे. याशिवाय एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या ८ महिन्याच्या कालावधीत भांडूप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध ५ कोटी ०१ लाख रुपयांची दंडात्मक वीज आकारणीची कारवाई करण्यात आली आहे. तर ४८९ वीजचोरांकडून ४ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.