पनवेल दि.२१: पनवेल महानगर प्रेस क्लबतर्फे सामाजिक बांधिलकी जपत पनवेल शहरात उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलीस निवारा कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. या सुसज्ज निवारा कक्षाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
उन्हा-पावसात, धूळ आणि प्रदूषणात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना विश्रांतीसाठी आणि सुविधेसाठी पनवेल महानगर प्रेस क्लबने पुढाकार घेऊन नवीन पनवेल येथील एचडीएफसी बैंक्स सर्कल जवळ या कक्षाची उभारणी केली आहे.
वाहतूक नियोजन करताना क्षणाचीही सावली नसणाऱ्या पोलिसांसाठी निवारा कक्ष उभारण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते प्रकाश बिनेदार आणि म्हात्रे अपघात रुग्णालयाचे डॉ. नितीन म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.
या सोहळ्याला नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस उप आयुक्त योगेश गावडे, पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, डॉ. नितीन म्हात्रे, गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक गणेश कडू, अजय बहिरा आणि नगरसेविका अस्मिता घरत तसेच पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, अनिल भोळे, सहसचिव स्वप्नील दुधारे, खजिनदार सचिन भोळे आणि लालचंद यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
