उलवे, ता. २६ (कृष्णा पाटील) : उरण तालुक्यातील जीटीआय बंदराच्या गेटवर शेकडो कामगारांनी मंगळवारी (ता. २४) ‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कुठल्याही कामगारावरील अन्याय सहन केला जाणार नाही. येथे ड्रायव्हर म्हणून काम करणारा स्वतःच्या जीवावर उदार होऊन वाहतूक करतोय, पण बऱ्याच वेळा त्याला जेवायलाही वेळ मिळत नाही, अशा अवस्थेत शेकडो ड्रायव्हर इमानेइतबारे काम करीत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही. ‘जीटीआय लेबर बोर्ड’ ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे कामगारांची नोकरी सुरक्षित होईल. त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अनेक ठेकेदार बदलले जातात, त्यामुळे कामगारांची ससेहोलपट होते. हे सहन केले जाणार नाही, प्रशासनाने कामगारांबाबत जर आडमुठी भूमिका घेतली तर ‘काम बंद आंदोलन’ करावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
न्यू मॅरिटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रामण यांनीही कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती दिली, ते म्हणाले, ‘जीटीआय लेबर बोर्ड’ हे झालेच पाहिजे, त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, परिस्थितीत कायद्याची लढाई लढू, पण कामगारांना न्याय मिळवून देणारच. आपले नेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांसाठी ४० वर्षे लढतायत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आपणास निश्चितच न्याय मिळेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी न्यू मॅरिटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.
![]()
