पनवेल दि.२६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि शिकवण सर्व समाजाला अधिकार व साक्षर करणारे असून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला ताकद दिली, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज येथे केले. पनवेल महानगरपालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात ‘संविधान दिन’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या स्मृतीस त्यांनी अभिवादन केले. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर व नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, लीना गरड, उपायुक्त जमीर लेंगरेकर, वक्ते अक्रम तिवारी, प्रशांत कांबळे यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परेश ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. बाबासाहेबांनी दिलेले संविधान देशातील सर्वात सुंदर संविधान असून यातून सर्व घटकाला न्याय देण्याचे काम होत आहे. संविधानाचा उपयोग दुसऱ्यालाही झाले पाहिजे, याची जबाबदारी युवा पिढी आहे असे सांगितले. या भवनातील अभ्यासकेंद्रात विद्यार्थी बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिकत आहे, याचा आनंद होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी करून हे विद्यार्थी या भवनाची संपत्ती आहे, असे आवर्जून नमूद केले.