पणजी दि.15 (गोवा) काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला ‘दी कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने विश्वभरात वाचा फोडली. त्यानंतर ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतरित करून त्यांचा जिहादी आतंकवादासाठी वापर करण्याचे षड्यंत्र मांडण्यात आले. गोव्यातही पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझीशन’च्या नावाखाली जनतेवर केलेले अमानवी अत्याचार संपूर्ण देशाला कळणे आवश्यक आहे. गोव्याचा खरा इतिहास समजून घेणे, हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. ख्रिस्ती धर्मगुरु पोप हे विश्वभरात अनेक ठिकाणी जाऊन ख्रिस्त्यांकडून झालेल्या अमानुष अत्याचारांची जाहीर माफी मागत असतात. तशी माफी गोव्यातील जनतेची त्यांनी आतापर्यंत का मागितलेली नाही ? गोव्याचा तो काळा इतिहास अधिक काळ जनतेपासून लपवून ठेवता येणार नाही. ‘कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ वरही चर्चा व्हावी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेला आंदोलनाला गती मिळावी, यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही 16 ते 22 जून 2023 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘हॉटेल डेलमन’ येथे आयोजित या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश जोशी हे उपस्थित होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले की, या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील 28 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1500 हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, काशी-ज्ञानवापी मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, ‘विश्व हिंदु परिषदे’चे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, ‘भारत माता की जय’ संघटनेचे सुभाष वेलिंगकर यांच्यासह अनेक उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय पातळीवर, तसेच राज्य आणि जिल्हा पातळीवर हिंदु संघटनांच्या एकत्रिकरणातून ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करण्यासाठी प्रत्यक्ष नियोजन करण्यात येणार आहे. समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल सर्टीफिकेशन’, ‘मंदिरांची मुक्ती’, ‘घरवापसी’ आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनात विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंदिरांचे सुप्रबंधन, ‘अभिव्यक्ती – स्वातंत्र्य कि दायित्व ?’ आदी विषयांवर परिसंवाद असणार आहेत.