मुंबई, दि.17 : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या व्हिडिओ कॉन्फरन्सला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, खा.विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते सर्व केले जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे. या कालावधीत प्रशासनानेही चांगले काम केले आहे. खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ व योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम चालू ठेवावे. नुकसानग्रस्तांना वाढीव मदतीचा शासन निर्णय आजच निर्गमित करुन वाटप तात्काळ सुरु करण्यात येईल.
प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शासनाने दिलेली मदत ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संकट कितीही गंभीर असले तरी सरकार जनतेसोबतच आहे. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळबागा वाचविण्यासाठी निश्चित असे धोरण लवकरच आखण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.