पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात रॅली काढण्यात आली.
यावेळी लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी किर्ती महाजन यांनी पाठ्य पुस्तक, पुष्प व चॉकलेट देऊन सर्व विदयार्थ्यांचे स्वागत केले. तसेच इतर नऊ शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी यावेळी खास सेल्फी पाँईट तयार करण्यात आला.याठिकाणी विद्यार्थ्यांनी, पालकांनी सेल्फी काढल्या.
तसेच दिनांक १४ जून रोजी दहा शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.2 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता पडताळणी करण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये शारीरिक विकास, गणिती क्रिया , सामाजिक व भाषिक विकास अशा प्रकार सात स्टॉल मांडण्यात आले होते. या सातही स्टॉलवरती मुलांना हसत खेळत चित्रांच्या माध्यमातून ,खेळण्यांच्या माध्यमातून प्रश्नोत्तरे विचारून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर या नवीन विदयार्थ्याचे औक्षण करून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागताने सर्व मुले भारावून गेली होती.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास तपासण्यासाठी एप्रिल महिन्यात अशाच पध्दतीचा पहिला मेळावा घेण्यात आला होता. दिनांक 14 जून रोजी दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावर्षी लोकनेते दि.बा पाटील शाळेमध्ये महापालिकेच्या इंग्लीश मिडीयम शाळेचा सिनीअर केजीचा वर्ग सुरू करण्यात आला. मागील वर्षी पासून महापालिकेने ज्युनिअर केजीचा वर्ग सुरू करून इंग्लीश मिडीयम शाळा सुरू केली होती. या शाळेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. आज या शाळेच्या विद्यार्थ्यांचे देखील औक्षण करून गुलाब पुष्प,चौकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

धाकटा खांदा येथील शाळेमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगरसेवक मनेाहर म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या मुख्यध्यापक सुमन हिलम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळेची पटसंख्या, पुस्तक वाटप याविषयी माहिती घेतली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!