पनवेल दि.१०: स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी पनवेलमध्ये या यात्रेच्या समारोपावेळी स्वांतत्र्यवीर सावरकर चौकात केले. पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. चौकाचौकात पुष्पवृष्टी करण्यासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या.
पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. खारघरच्या लिटिल मॉलपासून संध्याकाळी 4.30 वाजता शेकडो दुचाकीस्वारांच्या या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत एका सजवलेल्या रथावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा होती. दुसर्या रथावर अंदमान तुरुंगाचा दरवाजा व त्याच्यासमोर बसलेले स्वातंत्र्यवीर असा देखावा होता. मार्गात ठिकठिकाणी त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने गौरव यात्रेचे स्वागत करण्यात आले. अल्पसंख्याक महिला व युवा कार्यकर्त्यांनी या गौरव यात्रेवर पुष्पवृष्टी केली.
या गौरव यात्रेत भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, चिटणीस विक्रांत पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, राजेश गायकर, शिवसेनेचे शहर संघटक अभिजीत साखरे, मंदा जंगले, सुलक्षणा जगदाळे, आरपीआय आठवले गटाचे किशोर गायकवाड, माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनाचे सदस्य, सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरव यात्रा खारघरनंतर कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी व नवीन पनवेल अशी फिरून रात्री 9.30च्या सुमारास पनवेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आली. तेथे ढोल ताशाच्या गजरात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान आपला समजून यात्रेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार मानले. आपल्या देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चहूबाजूने प्रगती होत असताना आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणार्या स्वातंत्र्यवीरांना विसरायचे का, असा सवाल त्यांनी विचारला. महात्मा गांधींनी सावरकरांना सोडायला सांगितले होते. त्यांचे आडनाव लावणारे मात्र सावरकरांचा अपमान करतात म्हणून आपल्याला जमावे लागले. आपल्या पुढच्या पिढीला सावरकरांच्या त्यागाची माहिती होण्यासाठी ही गौरव यात्रा काढली आहे. आपले भाग्य म्हणून आपल्याला या यात्रेत सहभागी होता आले, पण सावरकरांवर टीका करणार्यांना जाब विचारला पाहिजे. अपमान करणार्यांना लक्षात ठेवून त्यांचे पाप पदरात देऊया, असे ते म्हणाले.
प्रमुख व्याख्याते अलिबागचे अॅड. श्रीराम ठोसर यांनी या वेळी मै सावरकर नही म्हणणार्यांनी प्रथम सावरकर कोण होते हे समजून घेतले पाहिजे. काव्यात दहावा रस हा देशभक्तीचा असतो हे सावरकरांमुळे समजले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. त्यांनी माफी मागितली म्हणता, मग ते तुरुंगात का गेले ते सांगा. त्यांना दोन जन्मठेप झाल्या, दोन वर्षांची शिक्षा झाली तरी एवढा कांगावा कशाला असा प्रश्न करून हिंदूत्व सांगणारे सावरकर काँग्रेसवाल्यांना आवडत नसल्याचे सांगितले.