उरण दि. ५ (विठ्ठल ममताबादे) बेळगाव कर्नाटक येथील के. बी. कुलकर्णी स्मृती दिना निमित्ताने २०२६ चित्रकला प्रदर्शनामध्ये देवरुख कॉलेज ऑफ फाईन आर्टचा विद्यार्थी तथा उरण तालुक्याचे सुपुत्र वरद विलास गावंड याने काढलेले ‘शांततेच्या प्रवासात’ हे जलरंग चित्र निवडण्यात आले आहे. हे चित्र संधिप्रकाशातील समुद्राची संथ आणि शांत अवस्था अचूकपणे टिपते. निळ्या रंगाचे शीड असलेले एक छोटे जहाज संथ लाटांवर विसावले असून, ते समुद्राच्या शीतल छटांशी एकरूप झाले आहे. आकाशात रंगांची जणू एक मैफलच भरली आहे. गर्द निळा रंग हळूहळू गडद केशरी आणि कोमल पिवळ्या रंगात मिसळत मावळत्या सूर्याचे सात्विक सौंदर्य प्रतिबिंबित करत आहे. क्षितिजावर पक्ष्यांचे थवे मुक्तपणे विहार करत असून ते स्वातंत्र्याची जाणीव करून देतात. ही कलाकृती एकांत आणि निसर्ग अन् मानवाच्या चिरंतन नात्याचे दर्शन घडवते. हे चित्र १५ बाय २१ इंच आकाराच्या कागदावर जलरंग माध्यमात साकारले आहे.
हे प्रदर्शन बेळगाव येथील वररेकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत ४ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पहावयास मिळेल. वरदच्या या यशामागे कॉलेजच्या प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाचे लाभलेले बहुमोल मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. कॉलेजचे संस्थापक अजय पित्रे, कला कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!