कळंबोली दि.७: मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग मधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्याचे काम चालू केले आहे. त्यांनी मोर्चे जरूर काढावेत परंतु कोणत्याही समाजाविरुद्ध बेताल वक्तव्य करू नयेत अशी अपेक्षा कळंबोलीतील वंजारी समाजाच्या नेत्यांनी केली आहे. परभणी मधील मोर्चामध्ये त्यांनी वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. वंजारी समाजातील लोकांना घरात घुसून मारू असे जे वक्तव्य केले या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करत असताना दुसऱ्या समाजाला कमी लेखणे किंवा त्यांच्यावरती बेझुट आरोप करणे हे चुकीचे आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीच व्हावी ही सर्वच लोकांची मागणी आहे. परंतु गुन्हेगार वंजारी समाजाचे आहेत म्हणून संपूर्ण वंजारी समाजाला दोष देणे चुकीचे आहे. कोणत्याही गुन्हेगाराला जात धर्म पंथ नसतो, त्यामुळे त्यांना एका रेषेत सर्वांना धरणे चुकीचे आहे आणि मनोज जरांगे पाटील हे जसा काही सर्व समाजाच गुन्हेगार आहे अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करीत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे बबन बारकजे यांनी सांगितले आहे.
एका जिल्ह्यात वंजारी समाजाचे दोन मंत्री झाल्यामुळे काही लोकांच्या पोटात पोटसुळ उठलेला आहे. हे आहेतच कितीक यांना आम्ही संपवून टाकू अशा वल्गना लोकसभेच्या वेळी केल्या आणि लोकसभेला माननीय पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परंतु नंतर त्यांना विधान परिषदेवर घेतले व विधानसभेत धनंजय मुंडे राष्ट्रवादी तर्फे आमदार झाले त्यानंतर मंत्रिमंडळात दोघांनाही स्थान देण्यात आले. त्यामुळे काही अल्पसंतुष्ट आत्मे तडफडायला लागले आणि अशातच संतोष देशमुख यांची मस्साजोग मध्ये हत्या झाली आणि या प्रकरणाच्या आडून मंत्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांना टार्गेट करायला लागले. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरती गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला खालच्या पातळीवर जाऊन बोलणे हे चुकीचे आहे. परभणी मधील मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी व मनोज जरांगे यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्रभर त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येत आहेत . कळंबोली येथे मुख्य पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देण्यात आले व मनोज जरांगे पाटील यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी सर्व समाज बांधवातर्फे मागणी करण्यात आली. यावेळी सर्वश्री बबन बारगजे, काकासाहेब कुत्तरवडे, हरिदास वनवे, श्रीहरी मिसाळ गोपीनाथ तुळशीराम मुंडे, बाळू मिसाळ, सुरेश गोल्हार, दत्ता बिनवडे, सुभाष आंधळे, देविदास खेडकर, सुरेखा ताई खेडकर सह वंजारी समाजाचे बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी बोलताना बबनराव बारगजे यांनी सांगितले की जर आमच्या समाजाबद्दल कोणी बेताल वक्तव्य करीत असतील तर त्यांची अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत. येणाऱ्या काळात त्यांना रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देण्यात येईल .

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!