अलिबाग,दि.7 : करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि.15 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली. या मोहिमेस संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळाला.या मोहिमेचे स्वरूप अधिक व्यापक होण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी होण्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देताना रायगड जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अलिबाग शाखा तसेच रुरल अँड यंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या उत्साहाने प्रशासनाच्या हातात हात घालून “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.या अभियानात स्थानिक प्रशासन आणि अभाविप व रुरल अँड यंग फाउंडेशन, रायगड यांच्या 26 स्वयंसेवकांनी तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दिप्ती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील सारळ, पेढांबे, किहीम, कुसुंबळे, खंडाळे (सागरगड वाडी) व नागाव अशा सहा ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य सर्वेक्षणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.
यावेळी या स्वयंसेवकांनी नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजणे, ऑक्सिजनची पातळी मोजणे त्याचबरोबर करोनासारख्या आजाराशी लढताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रबोधन तसेच जनजागृतीचे काम केले. या सर्वेक्षणाद्वारे तब्बल 763 कुटुंबांना भेटी देऊन या स्वयंसेवकांनी 2 हजार 229 नागरिकांची तपासणी करण्याच्या कामात आरोग्य यंत्रणेला बहुमोल सहकार्य केले.
या कामासाठी सुशील साईकर, श्रेयस जोगळेकर, कमलेश ठाकूर, यश म्हात्रे या तरुणांनी पुढाकार घेतला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!