पनवेल दि.२२: जो पर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तो पर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनावेळी दिली. तसेच भाजपची भूमिका सर्व सामान्य जनतेमध्ये पोहचवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर तालुक्यातील चिपळे गावात जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी जनसामान्यांमध्ये मिळून काम करणारी पार्टी आहे. आज सुरु झालेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे निवडणुकी नंतर देखील संपूर्ण परिसरातील लोकांना सेवा देणारे हे केंद्र बनणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उभाटा गटाचे भोकरपाडा गावातील शाखा प्रमुख गजानन फुलोरे, अनिकेत फुलोरे, अभिजित फुलोरे तसेच विहिघर मधील रहिवासी तथा वीरार येथील उभाटा गटाचे शाखाप्रमुख विश्वनाथ कांबळे यांनी भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद अधिक मजबूत केली. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून त्यांचा निर्णय सार्थ ठरेल असे काम भाजपच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांना दिला.
यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, हनुमान फुलोरे, अशोक फुलोरे, रुपेश फुलोरे, गिरीश फुलोरे, बूथ अध्यक्ष भास्कर फुलोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.