रायगड दि. 22-विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी, असे निर्देश पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील 2005 च्या तुकडीचे अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघांसाठी भारतीय महसूल सेवेतील 2015 च्या तुकडीच्या अधिकारी ज्योती मीना यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे आज रायगड येथे आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज या दोन्ही खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक रविकिरण कोले, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.