पनवेल दि.२६: श्रावण मासानिमित्त पनवेलममधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर येथे सलग 24 दिवस 24 कलाकारांचे वादन हा आगळा वेगळा उपक्रम साकार होत आहे. श्रावणमास प्रारंभापासून दि. 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान रोज एक वादक आपली कला इथे सादर करत आहेत. यात सनई, संवादिनी, तबला, पखवाज, सतार, संतूर, व्हायोलिन, बासरी अशा अनेक वाद्यांचा समावेश आहे. विरुपाक्ष देवस्थान ट्रस्टचे सचिव गुरुनाथ लोंढे यांच्या संकल्पनेतून आणि देवस्थानचे अध्यक्ष श्रीनंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होत असलेल्या या अभिनव उपक्रमाची आखणी व नियोजन किरण बापट यांनी केली आहे. नवीन वादकांना वादनाच्या संधी मिळाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात याआधी सुभाष सातारकर (सनई), श्रीनिवास भालेराव (बासरी), ओंकार गोखले (संतूर), सत्यम खैरे (पखवाज), विनायक प्रधान (तबला), शुभदा गोडबोले (सतार), माधव भागवत व गंधार देशपांडे (तबला व कीबोर्ड), मयुरेश साठे (तबला), तन्मया कुलकर्णी (बासरी), विजय मनोहर व अदिती देवरुखकर (संतूर व व्हायोलिन), विराज गोडबोले (संवादिनी) या कलाकारांचे सादरीकरण झाले असून दि. 26 ऑगस्ट रोजी सुधन्वा कुलकर्णी (संवादिनी), 27 ऑगस्ट रोजी विशाल जोगळेकर (पखवाज), 28 ऑगस्ट रोजी विपुल ठक्कर (बासरी), 29 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ कुंभोजकर (तबला), 30 ऑगस्ट रोजी विराज कोपरकर (संवादिनी), 1 सप्टेंबर रोजी सचिन नागलकर (बासरी), 2 सप्टेंबर रोजी प्रशांत घरत (पखवाज), 3 सप्टेंबर रोजी केतकी कुलकर्णी, (संवादिनी), 4 सप्टेंबर रोजी कार्तिक पांडे (तबला), 6 सप्टेंबर रोजी आदित्य भावे (सतार), 8 सप्टेंबर रोजी ओंकार भुवड व महेश घाटे (पखवाज व संवादिनी), 9 सप्टेंबर रोजी रुणार्थ घरत (पखवाज) आणि 10 सप्टेंबर रोजी अथर्व कुलकर्णी व सहकारी (संवादिनी) यांचे सादरीकरण होईल.
या उपक्रमाची सांगता दि. 10 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रसिकांसाठी हा संपूर्ण उपक्रम विनाशुल्क असून त्यांनी रोज सायं. 7 ते 7.30 या वेळेत उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : गुरुनाथ लोंढे : 93207 28939 / किरण बापट : 84548 63342
