मुंबई दि.३१: यावर्षी गुरुवार दि. ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेरपूजन हे महत्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. या विषयी अधिक माहिती देतांना पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. दीपावलीच्या प्रत्येक दिवशीचे महत्त्व आणि मुहूर्त त्यांनी सांगितले.
सोमवार, १ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आहे. याच दिवशी प्रदोषकाली आश्विन कृष्ण द्वादशी असल्याने याच दिवशी गोवत्स द्वादशी – वसुबारस आहे. सायंकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करून त्यांना गोड जेवण देण्याची प्रथा आहे.
मंगळवार, २ नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आणि यमदीपदान आहे. आश्विन कृष्ण द्वादशी रोजी श्रीदत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी असते. म्हणून या दिवसास ‘गुरुद्वादशी‘ असे म्हणतात. या दिवशी प्रदोषकाली आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने याच दिवशी धनत्रयोदशी- धन्वंतरी पूजन आहे. या दिवशी गरीब गरजू लोकांना दीपदान, अन्नदान, वस्त्रदान करण्याची प्रथा आहे. गरीबानाही दिवाळी साजरी करता यावी हा त्यामागचा उद्देश आहे.
बुधवार ३ नोव्हेंबर रोजी आश्विन कृष्ण चतुर्दशी क्षयतिथी आहे. या दिवशी दीपावलीचा कोणताही सण नाही.
गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी , अभ्यंगस्नान, लक्ष्मीकुबेर पूजन, अलक्ष्मीनिस्सारण , महावीर निर्वाण आहे. या दिवशी चंद्रोदयाच्यावेळी पहाटे ५-४९ वाजता आश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरकचतुर्दशी आहे. चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे ५-४९ वाजेपासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी ६-४१ वाजेपर्यंत अभ्यंगस्नान करावयाचे आहे. गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण अमावास्या असल्याने प्रदोषकालात सायं सायं. ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य ! ते घरातून जावे यासाठी झाडूची पूजा करण्याचीही प्रथा आहे.
शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, विक्रम संवत् २०७८ प्रमादीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. तसेच महावीर जैन संवत् २५४८ चा प्रारंभ होत आहे. याचदिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे. शनिवार ६ नोव्हेंबर रोजी यमद्वितीया- भाऊबीज आहे.
पुढीलवर्षी आश्विन कृष्ण अमावास्येच्या दिवशी मंगळवार, २५ आक्टोबर २०२२ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुढीलवर्षी दिवाळी १० दिवस अगोदर येणार आहे.
पुढील दहा वर्षातील दीपावली बलिप्रतिपदेचे दिवस दा. कृ. सोमण यांनी सांगितले ते असे आहेत.
(१) बुधवार दि. २६ आक्टोबर २०२२ .
(२) मंगळवार दि. १४ नोव्हेंबर २०२३.
(३) शनिवार दि. २ नोव्हेंबर २०२४.
(४) बुधवार दि. २२ आक्टोबर २०२५.
(५) मंगळवार दि. १० नोव्हेंबर २०२६.
(६) शनिवार दि. ३० आक्टोबर २०२७.
(७) बुधवार दि. १८ आक्टोबर २०२८.
(८) मंगळवार दि. ६ नोव्हेंबर २०२९.
(९) रविवार दि. २७ आक्टोबर २०३०.
(१०) शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०३१.