ठाणे दि.11: यावर्षी नरक चतुर्दशी – लक्ष्मीपूजन शनिवार १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आणि बलिप्रतिपदा – भाऊबीज सोमवार १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने दीपावलीचा सण तीनच दिवस आला असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की यावर्षी शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजनाने दीपावली उत्सवास प्रारंभ होत आहे.
शनिवार १४ नोव्हेंबर रोजी पहाटे चंद्रोदयाच्यावेळी निज आश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने या दिवशी नरकचतुर्दशी आहे. तसेच याच दिवशी प्रदोषकाली निज आश्विन अमावास्या असल्याने लक्ष्मीकुबेर पूजन आहे. लक्ष्मी पूजन सायं. ६-०० ते रात्री ८-३२ या वेळेत प्रदोषकाळी करावयाचे आहे. रविवारी फक्त गोवर्धनपूजन आणि अन्नकूट आहे. सोमवार १६ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आहे तसेच या दिवशी कार्तिक शुक्ल द्वितीया क्षयतिथी असल्याने याच दिवशी भाऊबीजही साजरी करावयाची आहे. त्यामुळे यावर्षी दिपावलीच्या मुख्य सणाचे तीनच दिवस आले आहेत. यापूर्वी नरकचतुर्दशी – लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आणि बलिप्रतिपदा – भाऊबीज एकाच दिवशी असा योग सन २००९ मध्ये आला होता. आता यानंतर सन २०३९ मध्ये असाच योग येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
यावेळी दिवाळीच्याच दिवसात आकाशातही दीपोत्सव होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. साध्या डोळ्यांनी दिसणारे बुध, शुक्र ग्रह पहाटे पूर्वेला दिसणार आहेत आणि रात्रीच्या प्रारंभी मंगळ पूर्वेला तर गुरू व शनी पश्चिमेस साध्या डोळ्यांनी दिसणार आहेत. तसेच मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव उत्तररात्री ३ नंतर ईशान्य ( उत्तर-पूर्व ) दिशेस साध्या डोळ्यांनी दिसणार आहे. तसेच गुरुवार १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू-चंद्राच्या युतीत दिसणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.