कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांनी राजिनामा द्यावा; आमदार प्रशांत ठाकूर !
पनवेल दि.10: जनतेच्या भावनांची कदर नसलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने सतत जनतेची फसवणूक आणि निष्क्रिय कारभार केला आहे, त्यामुळे स्वतःला राज्याचे कुंटुंब प्रमुख म्हणवून घेणाऱ्या मात्र तसे कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केली. 
       एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगार मात्र तो ही थकल्यामुळे कंटाळून जळगाव येथील ‘एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी’ व रत्नागिरी येथील ‘पांडुरंग गदडे’ यांनी आत्महत्या केली. या दुर्दैवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला असून त्या विरोधात पनवेल एस्.टी. स्थानकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आंदोलनाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. 

या आंदोलनास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ‘क’ प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक संजय भोपी, शत्रुघ्न काकडे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, विनोद घरत, रवींद्र नाईक, अमरीश मोकल, योगेश लहाने, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी पुढे बोलताना म्हंटले कि, एकीकडे कोरोनाचे संक्रमण आहे आणि संक्रमणाच्या काळात जगामध्ये आपला भारत देश आपले वेगवेगळे सकारात्मक पाऊले उचलून आपल्या कार्यक्षमतेचे उदाहरण देत आहे. त्यावेळेला आज महाराष्ट्र्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार अकार्यक्षम आणि त्याचबरोबरीने कुचकामी ठरले आहे. आणि त्यामुळे या अकार्यक्षम कारभाराचा फटका राज्यातील नागरिकांना बसतोय. एसटीच्या कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार दिला नाही. आणि त्यामुळे आमच्यातील  एसटीतील सहकाऱ्याला आत्महत्या करावीशी वाटली.  महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना आधार देण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे कर्तव्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख म्हणून सांगतात, त्यांचीही हि जबाबदारी होती. जर ते त्यांच्या जबाबदारी पासून बाजूला जात असतील तर हे चित्र महाराष्ट्रासाठी आशादायक नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भाने आपण अभिमानाने बोलतो त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचा सरकार आहे. त्यातील दोन पक्ष वर्षानुवर्षे सत्तेत आहे तर एक पक्ष आता नव्याने नेतृत्व करू लागला आहे. आणि त्यांना घोड्यावर बसवून बाकीचे लोकं मजा बघत असून राज्यात सत्तेचा पोरखेळ चालला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.  एकीकडे कर्मचाऱ्यांना आश्वस्त करायचा आणि मागे फिरायचे हे काही योग्य चाललेले नाही. आपण पाहतो कि, अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकाराला आत्महत्येच्या नोटमध्ये नाव लिहिले म्हणून थेट अटक केली मग आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे कि, एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्येच्या चिट्ठीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल परब मृत्यूला जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.  मग मुख्यमंत्री आज अनिल परब यांना अटक करणार का आणि नैतिकता थोडी तरी शिल्लक असली तरी अनिल परब यांचा राजिनामा घेणार का आणि तो घेणार नसतील तर असे ढोंग अशा पद्धतीने चालवू नये,असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे एका कार्यक्षम सरकारची अपेक्षा आहे. या राज्याला सरकारकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे मात्र या महाविकास आघाडीकडून पूर्ण होताना दिसत नाही,असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एसटी कर्मचारी मनोज चौधरी, पांडुरंग गदडे या आमच्या सहकाऱ्यांनी आत्महत्या केली हि एक चिंतेची बाब असून एसटी कर्मचाऱ्यांसाठी काळी दिवाळी साजरी करायला हे सरकार भाग पाडत आहे. या सरकारचा धिक्कार करू तेवढा कमी आहे. सर्वसामान्य जनता रोज रस्त्यावर उतरू लागली आहे याचा जाब महाविकास आघाडी सरकारला जनतेला द्यावा लागेल, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित करून राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!