रत्नागिरी दि.१५(सुनील नलावडे) केवळ रत्नागिरीचीच नव्हे तर कोकणच नाव सांस्कृतिक विश्वात भारतभरात पोहोचवणारा आर्ट सर्कल आयोजित थिबा राजवाडा संगीत महोत्सव दि. 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी साकारत आहे. शास्त्रीय संगीताची स्वर्गीय अनुभूती आणि राजवाड्याची भव्यता हा संगम निव्वळ शास्त्रीय संगीत प्रेमींनाच नव्हे तर आबालवृद्धांना मोहात पाडतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी या महोत्सवाला हजेरी लावल्यामुळे हा स्वरमंच शब्दशः कीर्तिवंत झाला आहे. यंदाही या महोत्सवाला प्रतिभावान कलाकार लाभले आहेत. विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, पं. उल्हास कशाळकर, पं. सुरेश तळवलकर या जगप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने यंदाचा महोत्सव सजाणारच आहे पण नवोदितांच्या उपस्थितीनेही रंगणार आहे. दि. 24 रोजी महोत्सवाचे उदघाटन होईल डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांच्या भरतनाट्यम नृत्य कीर्तनाने! मंदिरामध्ये ईशसेवा करण्यासाठी म्हणून निर्माण झालेली भरतनाट्यम ही नृत्यशैली अस्सल भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे. डॉ. कनिनिका आणि पूजा ह्या कलाकारद्वय कीर्तन, नृत्य, संगीत यांचा अनोखा मेळ साधत नृत्यकीर्तन सादर करणार आहेत. नृत्यकीर्तन नंतर लगेचच विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे दि. 25 रोजीचा प्रारंभ महाराष्ट्रातील आश्वासक युवा गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या गायनाने होणार आहे. त्या नंतर लगेचच संतूर वादक संदीप चॅटर्जी, बासरी वादक संतोष संत, तबला वादक पं. रामदास पळसुले आणि पखवाज वादक पं. भवानीशांकर यांची जुगलबंदी रंगणार आहे. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी अर्थात दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुरुवातीला असलेले विशेष आकर्षण म्हणजे स्त्री ताल तरंग -लय राग समर्पण! घटम सारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या वाद्यावर घटम वादक सुकन्या रामगोपाल यांनी जबरदस्त प्रभुत्व प्राप्त केलं आहे. भारतातील त्या पहिल्या स्त्री घटमवादक आहेत. वेगवेगळ्या श्रुतीचे 6 ते 7 घटम एकत्र ठेवून त्यातून अप्रतिम तालनिर्मिती करणारा घटतरंग हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. प्रतिभावान कलाकारांच्या सादरीकरणाने यंदाचाही महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे अविस्मरणीय व्हावा यासाठी आर्ट सर्कल प्रयत्नशील आहे. रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि महोत्सवाचा आनन्द घ्यावा असे आवाहन आर्ट सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!