“सामाजिक व्यवस्था टिकण्यासाठी लग्न संस्था महत्त्वाची आहे. यासाठी युवांनी सावधपणे लग्नासाठी जोडीदार निवडावा”
कर्जत दि.२७: जीवनविद्या मिशन तर्फे आयोजित आनंद मेळाव्यामध्ये चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात क्षितीजा पवार आणि मेघना पाडवे या दोन युवांनी प्रल्हाद पै यांच्याशी चर्चात्मक संवाद साधला. ‘युवा अनप्लग’ या पॉडकास्ट अंर्तगत हा संवाद साधण्यात आला. ज्यामध्ये युवा पिढीला सामोरं जाव्या लागणाऱ्या अनेक समस्यांवर अनेक प्रश्न प्रल्हाद पै यांना या दोघींनी विचारले. प्रल्हाद पैंनी देखील खेळीमेळीचे वातावरण निर्माण करीत या सर्व प्रश्नांना योग्य आणि तरूणांना सहज पटतील अशी उत्तरे दिली.
करियर बाबत मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षणासोबत तरूणांनी विविध कौशल्ये कशी आत्मसात करावी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे करिअरमध्ये येणारे प्रेशर अथवा स्ट्रेस कमी करण्यासाठी कोणतेही काम करताना प्रेझेंटमध्ये राहण्याचा सल्ला दिला. कारण जेव्हा माणूस प्रेझेंटमध्ये असतो तेव्हा त्याचा आपल्या आत्मतत्त्वाला सहज स्पर्श होत असतो. ज्यामुळे त्याच्यातील कौशल्य, कल्पकता वाढते आणि त्याला काम करण्याचा खरा आनंद मिळतो. प्रेझेंटमध्ये राहिल्यामुळे माणसाची विनाताणतणाव घेता भरभर प्रगती होत जाते. त्याचप्रमाणे योग्य वयात योग्य गोष्टी करण्याचा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी यावेळी युवकांना दिला. थोडक्यात तरूणांनी अभ्यासाच्या वेळी अभ्यासच करा. अभ्यास करायच्या वयात प्रेम करत बसू नका असं ते म्हणाले.
समाज टिकून राहण्यासाठी लग्नसंस्था फार महत्त्वाची आहे. यासाठी मुलामुलींनी लग्न अवश्य करावे पण ते करताना सावधपणे निर्णय घ्यावा. लग्न करताना सौंदर्यासोबतच भावी जोडीदाराचे शिक्षण, स्वभाव, घरातील नातेवाईक, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टी सावधपणे पाहाव्या. लग्न ठरल्यानंतर काही चुकीच्या गोष्टी आढळल्यास निर्णय बदलायला मागेपुढे पाहू नये असंही त्यांनी ठामपणे सांगितले. कारण शेवटी हा मुलामुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं भावनिक होवून चालणार नाही. मुलामुलींनी लग्नानंतर जबाबदारीने कसे वागावे याबाबत अनेक टिप्स त्यांनी युवकांना दिल्या. शिवाय जीवनात दोन दिवस भाळण्याचे असतात बाकीचे सर्व सांभाळण्याचे असतात असं सांगत त्यांनी युवकांना जीवनात तडजोड करण्याचे किती महत्त्व आहे हे देखील सहज पटवून दिले.
युवकांनी आईवडील त्याचप्रमाणे इतर वडिलधाऱ्या अनुभवी लोकांचा सल्ला जरूर ऐकावा असं सांगितलं. कारण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तोच खरा शहाणा. युवकांना जर त्यांची लाईफस्टाईल चेंज करायची असेल तर त्यांनी कृतज्ञता, शुभचिंतन, लववर्क करणं किती गरजेचे आहे हे त्यांच्या मार्गदर्शनातून सतत जाणवत होते.
जीवनविद्या वे ऑफ लाईफ होण्यासाठी युवकांनी जीवनविदेत शिकवल्या जाणाऱ्या विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना साधना, कृतज्ञता साधना, आरोग्य साधना आणि भलं करची साधना यासाठी दिवसभरात थोडा वेळ काढावा. ज्यामुळे तुमच्या जीवनातील कटकटी आपोआप कमी होतील असं सांगत त्यांनी तरूणांना मोलाचे मार्गदर्शन केले.
आनंद मेळावा चौथ्या दिवशीच्या पहिल्या पर्वात जेष्ठ नामधारिका शकुंतला ढोले आणि जेष्ठ प्रबोधक सुभाष पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. जीवनविद्या मिशनचे कार्य आयुष्यभर निस्वार्थपणे करणाऱ्या काही कार्यकत्यांना या कार्यक्रमात जीवनगौरव या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आलं.
थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतमधील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हजारो शिष्यमंडळी सहभागी होत आहेत. दररोज दोन पर्वात विविध उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमांर्तगत करण्यात येत आहेत. सकाळच्या पहिल्या पर्वात ज्ञानेश्वर माऊली प्रणित हरिपाठ, दिव्य अनुभूती देणारी मानसपूजा, गुरुपूजन, विश्वप्रार्थना साधना अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!