अलिबाग,दि.24: सध्या दसरा, दिवळाचीच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदी-विक्रीत उत्साहाचे वातावरण आहे. लॉकडाउनच्या खंडानंतर वाहनांची खरेदी-विक्री जोमाने सुरू झाली आहे. आता सर्वत्र ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू असून, अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठया प्रमाणात खरेदी होत असते. दसऱ्याच्या दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा व त्यानुषंगाने शासकीय महसूलही जमा व्हावा, याकरिता राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये / उप प्रादेशिक परिवहन कार्यालये रविवार, दि.25 ऑक्टोबर 2020 (दसरा) या सार्वजनिक सुटटीच्या दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश परिवहन उप आयुक्त (प्रशासन), परिवहन आयुक्त कार्यालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी दिले आहेत.
त्याप्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालय रविवार (दसरा) दि.25 ऑक्टोबर रोजी नवीन वाहन नोंदणी कामकाज व तसेच त्यानुषंगाने शासकीय महसूल वसूलीच्या कामकाजासाठी सुरु ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.