पनवेल दि.23: कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यानी राजकारण नाही तर लोकांसाठी जबाबदारीने काम केले, असे गौरवोद्गार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे काढले. .
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड भाजपच्या माध्यमातून जिल्हयातील तालुका व शहर मंडलाच्यावतीने लाखो नागरिकांना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन समाजाभिमुख कार्य २३ मार्च पासून हाती घेतले,त्या समाजाभिमुख कार्याची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घेऊन भाजपा पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याची माहिती तालुकास्तरावरील जनतेला इ – पुस्तीकेच्या माध्यमातून व्हावी यासाठी उत्तर रायगड जिल्हा तसेच खोपोली, पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर मंडल भाजपाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सेवाभावाची प्रचिती’ सेवाकार्य इ – पुस्तीका प्रकाशन सोहळा पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. 
माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्याचे महान कार्य हाती घेतले. लाखो जणांना त्यांनाही सर्वतोपरी मदत केली. त्याची पोच पावती म्हणून त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल या कार्यक्रमात रायगड जिल्हा भाजपच्यावतीने अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच कोरोना काळात मदतीचा हात देत असतानाच कोरोना रुग्णांना आधार देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पीपीई किट घालून कोरोना रुग्णांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. त्याबद्दल या दोन्ही आमदारांचे या कार्यक्रमात आभार व्यक्त करण्यात आले. 
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले कि, जनतेसाठी सरकरने काम करणे अपेक्षित असते मात्र राज्य सरकार सत्ता कशी टिकवता येईल यावर लक्ष केंद्रित काम करीत आहे. या तिघाडी सरकारला लोकांच्या प्रश्नाची जण राहिली नाही. हे सरकार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत सत्ता ढकलत नेण्याचे काम करीत आहे, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला. देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी अवकाळी पावसाची भरपाई पंचनामा न करता सरसकट द्यावी अशी मागणी केली होती. मात्र आता मुख्यमंत्री शेतकऱ्यांना सरसकट भरपाई का देत नाही असा सवाल उपस्थित करून त्यांना सोयीने विसर पडला आहे असा घणाघाती हल्ला त्यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांनी समाजाप्रती आदराची भूमिका ठेवून सेवाभावाने काम केले. राज्यात भाजप काम करीत होते तर सत्तेत असलेले राज्य सरकार फक्त दिखाऊ पणा करीत होते. असे सांगतानाच संकटाच्या प्रसंगाला धावून येणारा पक्ष असे स्वतःला म्हणवून घेणारा शिवसेना पक्ष सत्तेत बसल्यावर काहीही करू शकला नाही, असा टोला त्यांनी लगावला. कोरोना महामारीत जगात पसरत असताना आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वेळेवर लॉकडाऊन करत देशावरचे फार मोठे संकट दूर केले तसेच नागरिकांच्या हितासाठी पॅकेज आणि वेळेवर निर्णय घेतली असे नमूद करताना राज्यात आलेल्या अतिवृष्टी संकटात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर व इतर भाजपनेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला आधार देत आहेत, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुलावर उभे राहून दिखावा करीत आहे आणि घरी राहून महाराष्ट्राचा आढावा घेत आहेत, असा खोचक टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. 
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भाजप उत्तर रायगड जिल्ह्यावतीने जिल्ह्यात लोकांना अन्नधान्य, मोदी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून भोजन, मास्क, सॅनिटायझर, औषधे, परप्रातीयांना तसेच कोकणात जायला नागरिकांना मदत, कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी मदत, अशी अनेक सामाजिक बांधिलकीचे कामे कोरोना काळातही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली याचा आपल्याला अभिमान आहे, असे अधोरेखित करून त्यांनी या कार्याप्रती कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी कोरोनाने निधन पावलेले बापू घारे, राजू बनकर यांनी कोरोना काळात स्वतःकडे दुर्लक्ष करीत लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने केलेल्या कामाची आठवण करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. 
यावेळी आमदार महेश बालदी यांनी म्हंटले कि, कोरोनाच्या या वैश्विक महामारीच्या काळात गोर गरीब तसेच आदिवासी नागरिकांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे काम भाजपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला स्वताचा जीव धोक्यात घालून हाती घेतले, आणि लाँकडाऊनच्या काळावधीत लोकसेवक हा कसा असावा हे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता विरोधकांना दाखवून दिले आहे. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यानी कोणत्याही प्रकारची प्रसिध्दी न घेता देशहित जपत गोर गरीब नागरिकांना मदत केली याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी म्हंटले. 
यावेळी व्यासपीठावर कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, के. के. म्हात्रे, प्रल्हाद केणी, संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, कोकण मीडिया सेलचे श्री. अभिजित आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहराध्यक्षा वर्षा नाईक, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, मोना अडवाणी, बिना गोगरी, अमरीश मोकल, यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, आदी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!