पनवेल दि.२: आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे आगरी समाज काल आज आणि उद्या या शीर्षकाखाली समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाज बांधव, भगिनींचा भव्य मेळावा रविवारी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी आपली मते व्यक्त करून समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
या मेळाव्यास आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार संजय पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते महेंद्र घरत, उद्योगपती जे.एम. म्हात्रे, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कार्याध्यक्ष जे.डी.तांडेल, सरचिटणीस दिपक म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, कामगार नेते भूषण पाटील, राजेश गायकर, संतोष केणे, दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेश ठाकूर, सोन्या पाटील, संतोष घरत, दीपक पाटील, भावना घाणेकर, वंदना घरत यांच्यासह आगरी समाजाचे बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. या वेळी आगरी समाजातील नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि खासदार संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक समाज आपापल्या संघटना बळकट करत आहेत. आम्हीही आमची आगरी समाजाची संघटना एकसंघ मातृसंस्था म्हणून अखिल आगरी समाजाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा हा पहिला प्रयत्न केला आहे. समाजातील नवतरुणांमध्ये जागृती व्हावी याकरिता या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे मत परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील व्यक्त केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी जो संघर्ष इथल्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केला, त्यामुळेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसतंय.
आधीपासूनच समाज कष्टाने स्वाभिमानाने जगत राहिला, परंतु समाजाच्या कथा व्यथा या सर्व मांडण्याकरिता अखिल आगरी समाज परिषदचे व्यासपीठ निर्माण झाले, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आमदार गणेश नाईक यांनी काढले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, आपण ज्या ज्या परिसरात राहतो त्या परिसराचे संदर्भ आणि प्रश्न बदलत चाललेले आहेत. समाज हा वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणार्या आपणा सर्वांच्या धडपडणार्या आणि त्याचबरोबर चळवळ आंदोलनाच्या मार्गामध्ये पुढे जाणार्या आपल्या सर्व सहकार्यांमुळे समाज अधिकाधिक व्यापक आणि मोठा होत चाललेला आहे. आपण आज ज्या गावात बसलोय ती भूमी क्रांतीची आहे. या भूमीने 1984 सालच्या आंदोलनाची धग पाहिलेली आहे. लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या विरोधातील आंदोलन आणि आंदोलनामुळे दि.बा. पाटीलसाहेबांचा लढा महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेला. या आंदोलनामुळे जे साडेबारा टक्के विकसित भूखंड भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना द्यायचे तत्व प्रस्तापित झाले आणि त्यामुळे पाटीलसाहेबांचे नेतृत्व आणि समाजाचा लढा साता समुद्रापलिकडे जाऊन पोहचला त्यातून आगरी समाजाची संघर्षशील प्रवृत्ती अधिक ठळक झाली. आपल्याला साहेबांनी एक मंत्र दिलाय की, लढल्याशिवाय मिळत नाही आणि लढणे हे थांबवायचे नसते. समाजाच्या मागण्यांसाठी व प्रगतीसाठी जोमाने वाटचाल करूया. अन्य उपस्थित वक्त्यांनीही आपले विचार व्यक्त केले. या वेळी आगरी दर्पण या मासिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.