माथेरान (मुकुंद रांजणे) दि.०२ अत्यंत चिकाटीने आणि मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात कर्जत तालुक्यात माथेरानच्या प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक पटकावला असून तालुक्यातील एकूण २९७ शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता. प्राथमिक शाळेतील स्वच्छता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिस्तबद्ध वागणूक, विद्यार्थ्यांचा विविध कार्यक्रमात सहभाग आणि शाळेच्या गुणवत्तेच्या आधारावर माथेरानच्या प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तीन लाख रुपयांच्या बक्षीसाची मानकरी ठरली आहे.याकामी शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती शिंदे, मुख्याध्यापक दिलीप आहिरे, शिक्षक सचिन भोईर, अनिश पाटील, संतोष चाटसे साक्षी कदम, निकिता चव्हाण, मनिषा चौधरी , किरण शिंदे,त्याचबरोबर नगरपरिषदेच्या अभियंत्या करुणा बांगर ,लेखापाल अंकुश इचके,अधीक्षक सदानंद इंगळे, लिपिक जयवंत वर्तक, लेखापाल भारत पाटील ,स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत, ज्ञानेश्वर सदगीर,अन्सार महापुळे या नगरपरिषदेच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले. शाळेने मोलाची कामगिरी केल्याबद्दल अभ्यासू पालक वर्गातून आनंद व्यक्त केला जात असून नागरिकांनी सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.
इंग्रजी भाषेचे धडे गिरविण्याच्या नादात अनेकदा पालक वर्गाचे लक्ष मराठी शाळेकडे आकर्षित होत नाही. जो तो उठसूट आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत शिक्षण देण्यासाठी उत्सुक दिसतात परंतु मराठी शाळेत ज्याप्रकारे संस्कार आणि सामाजिक बांधिलकी, देशसेवा, मातृ पितृऋण त्याचप्रमाणे मुलांच्या बालमनावर जी काही उत्तम प्रकारे जडणघडण केली जाते त्याकडे दुर्लक्ष करून आजकाल पालक वर्ग इंग्रजी शाळेकडे आकर्षित होताना दिसत आहे. भले शाळेची फी भरण्यास रक्कम नसली तरी सुद्धा कर्जबाजारी होऊन केवळ मुलाने इंग्रजी बोलावे ह्या अपेक्षेने मराठी शाळेकडे कानाडोळा करत आहेत त्यामुळेच दिवसेंदिवस मराठी माध्यमाच्या शाळेत पटसंख्या कमी होत चालली आहे.
नगरपरिषदेचे उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानात आम्ही सहभाग घेतला. सर्व शिक्षक, पालक आणि सामाजिक संघटना यांनी या करीता मोलाचे योगदान दिले आहे. यापुढे गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि भविष्यवेधी शिक्षण हे आमचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे.
दिलीप आहिरे – मुख्याध्यापक,प्राथमिक शाळा माथेरान